जेडीएससोबत थर्ड क्लास नागरिकासारखा व्यवहार करू नका, कुमारस्वामींचा काँग्रेसला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 19:59 IST2019-01-14T19:54:42+5:302019-01-14T19:59:00+5:30
भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कर्नाटकमध्ये सत्तेसाठीचे राजकीय नाटक पुन्हा एकदा रंग भरू लागले आहे. तर दुसरीकडे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

जेडीएससोबत थर्ड क्लास नागरिकासारखा व्यवहार करू नका, कुमारस्वामींचा काँग्रेसला इशारा
बंगळुरू - भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कर्नाटकमध्ये सत्तेसाठीचे राजकीय नाटक पुन्हा एकदा रंग भरू लागले आहे. तर दुसरीकडे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. काँग्रेसने आमच्या पक्षासोबत थर्ड क्लास श्रेणीतील नागरिकांसारखा व्यवहार करू नये, असा इशारा आज मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमधील जागावाटपावरून सध्या जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसमध्या खडाखडी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुमारस्वानी यांनी भाजपाविरोधात एकजुटीने लढण्यासाठी दोन्ही पक्षांना वाटाघाटींचे धोरण स्वीकारावे लागेल, असे म्हटले आहे.
कुमारस्वामी म्हणाले, ''काँग्रेसने आम्हाला सन्मानाने वागवले पाहिजे. त्यांनी आमच्यासोबत तृतीय श्रेणीतील नागरिकांप्रमाणे व्यवहार करू नये. इथे देवाण घेवाणीचे धोरण स्वीकारले पाहिजे.'' कर्नाटकमधील लोकसभेच्या जागावाटपामध्ये जनता दल सेक्युलरने 28 जागांपैकी 12 जागांची मागणी केली आहे. मात्र काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 17, काँग्रेसने 9 आणि जेडीएसने दोन जागांवर विजय मिळवला होता.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस आणि जेडीएससाठी अग्निपरीक्षेसारखी असणार आहे. कारण जेडीएसने जुना म्हैसूर भागातील जागांची मागणी केली आहे. येथील वोक्कालिग समुदायामध्ये जेडीएसचा प्रभाव आहे. मात्र येथील बहुतांश जागांवर काँग्रेसचे खासदार असल्याने काँग्रेसचे नेते या जागा सोडण्यास नकार देत आहेत.