Heart Attack Deaths: या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:06 IST2025-07-01T13:05:50+5:302025-07-01T13:06:07+5:30

Karnataka Herat Attack News: गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Karnataka Herat Attack News: 18 youths die of heart attacks in a month in this district; Government orders inquiry | Heart Attack Deaths: या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश

Heart Attack Deaths: या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश

Karnataka Herat Attack News: गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. कर्नाटक सरकारने तर या घटना रोखण्यासाठी 'पुनीत राजकुमार हृदय ज्योती' योजना सुरू केली आहे. परंतु, राज्यात हृदयविकाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अशातच, येथील  हसन जिल्ह्यात गेल्या महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने १८ तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश मृतांचे वय १८-४० दरम्यान होते. राज्य सरकारने या घटनांना गांभीर्याने घेतले असून, कर्नाटकचेआरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी हसन जिल्ह्यात हृदयविकाराच्या वाढत्या घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ञांकडून अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य मंत्री काय म्हणाले?
सोमवारी एक्स वर पोस्ट करताना मंत्री म्हणाले की, आरोग्य विभागाने हसन जिल्ह्यात एका महिन्यात नोंदवलेल्या हृदयविकाराच्या १८ प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली आहे. मी विभागाच्या अधिकाऱ्यांना 'जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्च'च्या संचालकांच्या नेतृत्वाखाली हृदयविकाराच्या वाढत्या प्रकरणांची तज्ञांकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

'पुनीत राजकुमार हृदय ज्योती' योजना सुरू
राज्य सरकारने हृदयविकाराच्या घटना रोखण्यासाठी 'पुनीत राजकुमार हृदय ज्योती' योजना सुरू केली आहे. परंतु, अलिकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांवर सखोल संशोधन करण्याची गरज आहे. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि असंसर्गजन्य आजार हे हृदयविकाराचे कारण मानले जात असले तरी, हासनमध्ये नोंदवलेल्या घटनांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी, तज्ञांच्या पथकाला संशोधन करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हृदयविकाराची लक्षणे
हृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात, तो हृदयाच्या स्नायूंना रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांमध्ये (कोरोनरी आर्टरीज) अडथळा आल्यामुळे येतो. हा अडथळा सहसा कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे किंवा रक्ताच्या गुठळ्यांमुळे होतो. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा तो भाग हळूहळू खराब होऊ शकतो. हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये छातीत दाब किंवा वेदना, हात, जबडा, पाठ किंवा मान दुखणे, धाप लागणे, घाम येणे, चक्कर येणे आणि मळमळ होणे यांचा समावेश आहे. वेळेवर उपचार न केल्यास ते घातक ठरू शकते. 

Web Title: Karnataka Herat Attack News: 18 youths die of heart attacks in a month in this district; Government orders inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.