अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याची तयारी, कर्नाटक सरकारचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:11 IST2024-12-16T13:10:32+5:302024-12-16T13:11:17+5:30
फुगवट्याविषयी केंद्राच्या अहवालाची प्रतीक्षा

अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याची तयारी, कर्नाटक सरकारचे नियोजन
सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे कर्नाटक सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी वाढणार असून, सिंचन क्षेत्रातही भरीव वाढ होणार आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, यासाठी राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. अलमट्टी धरणाच्या फुगवट्याविषयी केंद्र सरकार अधिसूचना जारी करत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही वेगळा निर्णय घेणार नाही. पण, धरणातील पाणीसाठा ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
दरम्यान, अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत कृष्णेला महापूर येत नाही, हे वडनेरे समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे, तरीही अलमट्टीच्या उंचीवाढीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. धरणाच्या बॅक वॉटरचा आणि धरणामुळे कथित महापूर येण्याचा अभ्यास वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. तो अहवाल आल्यानंतरच अलमट्टी धरण आणि महापुराचा संबंध स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वीच काही कार्यकर्त्यांनी धरणाची उंची वाढविण्याला महाराष्ट्र सरकारने कायदेशीर आव्हान देण्याची मागणी सुरू केली आहे.
वडनेरे यांच्या विरोधी भूमिका संभ्रमाच्या
२००५, २०१९ आणि २०२१ च्या महापुरानंतर त्याचा संबंध अलमट्टी धरणासोबत मोठ्या प्रमाणात जोडण्यात येऊ लागला आहे. महापुराच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या वडनेरे समितीने अलमट्टीमुळे महापूर येतो, हा दावा नि:संशयरीत्या फेटाळला आहे. सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून अहवालात तसे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पण, अहवाल सादर करून झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वी समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी आपलेच स्पष्टीकरण खोडून काढताना, अलमट्टीमुळे महापुराची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली.