Karnataka Election : कर्नाटकात मतदानापूर्वीच काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाची खर्गेंना नोटीस; पण कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 22:04 IST2023-05-08T22:03:18+5:302023-05-08T22:04:05+5:30
पाहा नक्की काय आहे प्रकरण. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावल्या.

Karnataka Election : कर्नाटकात मतदानापूर्वीच काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाची खर्गेंना नोटीस; पण कारण काय?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावल्या. आता १० मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीये. निवडणूक आयोगानं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली आहे. सोनिया गांधींचं 'सार्वभौमत्व' वालं विधान काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलं होतं. याप्रकरणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
आता निवडणूक आयोगानं खर्गे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे किंवा त्यांना दुरुस्त करण्यास सांगितलं आहे. हे राजकीय पक्षांनी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगानं खर्गे यांना कर्नाटक राज्याच्या संदर्भात 'सार्वभौमत्व' या शब्दाचा संदर्भ देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टचे स्पष्टीकरण आणि सुधारणा करण्यास सांगितलंय.
भाजपनं केली तक्रार
८ मे २०२३ रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते भूपेंद्र यादव, डॉ. जितेंद्र सिंह, तरुण चुग, अनिल बलुनी आणि ओम पाठक यांनी ट्वीट करून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ६ मे २०२३ रोजी रात्री ९:४६ वाजता केलेल्या ट्वीटकडे लक्ष वेधण्यात आलं.
काय म्हटलेलं ट्वीटमध्ये?
‘सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ६.५ कोटी कन्नडिगांना मोठा संदेश पाठवला आहे. काँग्रेस कोणालाही कर्नाटकच्या प्रतिष्ठेला, सार्वभौमत्वाला किंवा अखंडतेला धोका निर्माण करू देणार नाही,’ असं त्या ट्वीटमध्ये नमूद केलं होतं.