Karnataka DGP :कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक(डीजीपी) ओम प्रकाश यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पत्नीनेच ओम प्रकाश यांची हत्या केल्यामुळे पोलिस विभागही चकीत झाले आहे. ही घटना का आणि कोणत्या परिस्थितीत घडली, हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. ओम प्रकाश यांची हत्या अचानक घडलेली घटना नाही, तर यामागे अनेक संपत्तीचा वाद समोर आला आहे.
हत्या कशी झाली?बंगळुरू पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झाले. यानंतर माजी डीजीपी त्यांच्या गाडीत बसले आणि बहिणीच्या घरी गेले. त्यांची बहीण घटस्फोटित असून, एका खाजगी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. रविवारी दुपारी त्यांची मुलगी तिथे पोहोचली आणि त्यांना समजावून घरी पाठवले. पण घरी पोहोचल्यानंतर पती-पत्नीत पुन्हा भांडण झाले. यानंतर ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवीने त्यांच्यावर 8 ते 10 वेळा चाकूने वार करुन ठार मारले.
ओम प्रकाश 20 मिनिटे तडफडले...या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. पत्नीने छाती, पोट, पाठ अन् हातावर एकामागून एक वार केल्यामुळे घरात सर्वत्र रक्त सांडले. सुमारे 20 मिनिटे वेदनेने तडफडल्यानंतर ओमप्रकाश यांचा मृत्यू झाला. या वेळी पल्लवी आणि तिची मुलगी तिथेच उभे राहून ओम प्रकाश यांना मरताना पाहत होत्या. थोड्यावेळाने पल्लवीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पल्लवी आणि तिच्या मुलीला ताब्यात घेतले.
का उचलले टोकाचे पाऊल?मूळचे बिहारचे रहिवासी असलेले माजी डीजीपी ओम प्रकाश यांनी बंगळुरूमध्ये भरपूर संपत्ती जमवली होती. डीजीपी म्हणून काम करताना त्यांनी काली नदीच्या काठावर तीन एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी करुन एक भव्य फार्महाऊस बांधले होते. याशिवाय त्यांनी पत्नी आणि मुलीच्या नावावरही भरपूर मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आता प्रश्न पडतो की, पत्नी-मुलीच्या नावावर संपत्ती असूनही त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले? तर, पत्नी पल्लवीनेच आयपीएस फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये याचे उत्तर दिले आहे.
पत्नीने व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कारण सांगितलेमाझा नवरा मला आणि माझ्या मुलीला खूप त्रास देतोय. तो अनेकदा आमच्यावर बंदूक रोखतो आणि गोळ्या घालण्याची धमकी देतो, असे पत्नीने व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये म्हटले. याशिवाय, मालमत्तेचेही कारण सांगितले जात आहे. माजी डीजीपी यांचे दांडेली येथे एक शेत आहे. त्यांनी हे शेत त्यांच्या बहिणीच्या नावावर हस्तांतरित केले होते. यानंतर त्यांच्या घरात भांडणे सुरू झाली. याशिवाय त्यांची बंगळुरुमध्येही दोन घरे आहेत. यापैकी एक फ्लॅट कावेरी जंक्शन येथील प्रेस्टिज अपार्टमेंटमध्ये आहे, जिथे त्यांची हत्या झाली.
अनेक दिवसांपासून भाडण सुरू होते ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेय यानेही या घटनेची एक कहाणी सांगितली आहे. त्याची आई पल्लवी आणि बहीण कृती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करताना त्याने पोलिसांना सांगितले की, त्याची आई गेल्या एका आठवड्यापासून वडिलांचा छळ करत होती. ती त्यांना सातत्याने जीवे मारण्याची धमकी देत होती. यामुळेच ओम प्रकाश घर सोडून आत्या सरिताच्या घरी राहायला गेले होते.
अनेक महिलांशी संबंध ?पोलिस सूत्रांनुसार, माजी डीजीपी ओम प्रकाश हे शौकीन अधिकारी होते. आपल्या फार्म हाऊसमध्ये अनेकदा हाय प्रोफाइल पार्ट्या आयोजित करायचे. पत्नीन व्हॉट्सअॅप चॅटमध्ये हे मान्य केले आहे की, पतीचे अनेक मुली आणि महिलांशी अवैध संबंध होते. दरम्यान, आरोपी पत्नीने ओम प्रकाश यांचा स्वसंरक्षणार्थ खून केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. आता यात काय खरे आणि काय खोटे, हे पोलिस तपासात समोर येईलच.