Karnataka Assembly elections 2018: काय झालं होतं 2004, 2008 आणि 2013 निवडणुकीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 17:32 IST2018-05-07T17:32:15+5:302018-05-07T17:32:15+5:30
गेल्या विधानसभेत काँग्रेसला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करणारे कर्नाटकचे मतदार यंदा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Karnataka Assembly elections 2018: काय झालं होतं 2004, 2008 आणि 2013 निवडणुकीत!
बेंगळुरु- कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान होत आहे. येणारी विधानसभा ही कर्नाटकची पंधरावी विधानसभा असेल. 12 व्या आणि 13 व्या विधानसभेनंतर 14 विधानसभा ही तुलनेत स्थिर सरकार देणारी ठरली. एका विधानसभेत दोन किंवा तीन मुख्यमंत्री होण्याची रित कर्नाटकसाठी वेगळी नव्हती परंतु 14 व्या विधानसभेत सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले.
2004 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसपक्षाला 65 जागा मिळाल्या होत्या. 79 जागा मिळवणारा भाजपा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर जनता दल सेक्युलरला 58 जागा आणि इतर पक्षांना 22 जागा मिळाल्या होत्या. 2008 साली काँग्रेसला 80 जागा मिळाल्या तर 110 जागा मिळवणारा भाजपा स्वबळावर सत्तेत आला. जनता दल सेक्युलरला केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागले. आलटून पालटून कौल देणाऱ्या या राज्यामध्ये 2013 साली काँग्रेसला 120 जागा मिळाल्या आणि काँग्रेस स्वबळावर सत्तेत आला. भाजपाच्या जागा 110 वरुन 43 वर गेल्या तर जनता दल सेक्युलरला केवळ 29 जागा मिळाल्या. बीएसआरसी पक्षाला 3, केजेपीला 2, केएमपीला 1, अपक्षांना 8 जागा मिळाल्या. एक जागा नियुक्त सभासदाला मिळाली तर 18 जागा रिक्त राहिल्या.