'मनी हाईस्ट' बघून लुटलं १७ किलो सोनं, सहा महिने पोलिसांना मिळाला नाही पुरावा; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:03 IST2025-04-02T10:44:03+5:302025-04-02T11:03:44+5:30
कर्नाटकातल्या मोठ्या चोरीचा पर्दाफाश झाला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली.

'मनी हाईस्ट' बघून लुटलं १७ किलो सोनं, सहा महिने पोलिसांना मिळाला नाही पुरावा; पण...
Karnataka Crime:कर्नाटकातून चोरीची मोठी घटना समोर आली आहे. कर्ज न मिळाल्याने कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील एका व्यक्तीने बँकेतून तब्बल १७ किलो सोन्याची लूट केली. आरोपीला चोरीची कल्पना स्पॅनिश क्राईम ड्रामा सीरिज 'मनी हेस्ट'मधून सुचली होती. सहा ते सात महिने योजना आखून त्याने बँकेतून १३ कोटींच्या रुपयांच्या सोन्याची चोरी केली. पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्यांच्याकडून सोनं जप्त केलं आहे. यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्यासह पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. यावेळी जप्त करण्यात आलेले सोनं पाहून एखादं प्रदर्शन सुरु होतं की काय अशी चर्चा सुरु झालीय.
कर्नाटक पोलिसांनी बँकेवर दरोडा टाकून १७.७ किलो सोनं चोरणाऱ्या सहा जणांना अटक केली. २८ ऑक्टोबर 2024 रोजी दावणगिरी जिल्ह्यातील न्यामती इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दरोडा पडला होता. पोलिसांनी चोरीचे दागिने तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उसलमपट्टी शहरातील एका विहिरीतून जप्त केले. चोरीचा मुख्य आरोपी विजयकुमार हा आर्थिक संकटात होता. त्याने ऑगस्ट २०२३ मध्ये एसबीआय बँकेत १५ लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. याच रागातून त्याने बँकेतील १३ कोटी रुपयांचे सोने लुटले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजय कुमार (३०), त्याचा भाऊ अजय कुमार (२८), अभिषेक (२३), चंद्रू (२३), मंजुनाथ (३२) आणि परमदानंद (३०) यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसबीआय बँकेच्या शाखेच्या कर्मचाऱ्यांना एका स्ट्राँग रूममधील लॉकर गॅस कटरने तोडल्याचे सापडलं होतं. चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रील उचकटून आत प्रवेश केला आणि लॉकरसोबत घेऊन गेले. आरोपींनी सीसीटीव्ही फुटेज मिळू नये म्हणून बँकेचे डीव्हीआर काढून घेतले आणि तपासात अडथळा आणण्यासाठी चोरीच्या ठिकाणी मिरचीची पूड फेकली होती.
आरोपी विजयकुमारने त्याच्या पाच साथीदारांसह अनेक महिन्यांपासून बँक लुटण्याची योजना आखली होती. विजयकुमार आणि चंद्रू यांनी अनेकवेळा बँकेत जाऊन पाहणी देखील केली होती. दिवसा पोलिसांनी आणि आजूबाजूच्या लोकांना कळेल म्हणून आरोपींनी रात्री शेतातून बँकेत घुसण्याचे मॉकड्रिल देखील केले होते. त्यानंतर चोरीच्या दिवशी रात्री चोर खिडकीतून बँकेत शिरले. सायलेंट हायड्रॉलिक लोखंडी कटर आणि गॅस कटिंग टूल्सचा वापर चोरट्यांनी बँकेचे लॉकर फोडले. या दरम्यान कोणीही फोन वापरला नव्हता. आरोपींनी स्ट्राँग रूम आणि मॅनेजरच्या केबिनसह सगळ्या बँकेत मिरची पावडर फेकली होती.
चोरी केल्यानंतर आरोपींनी चोरीचे सोने विकण्यास सुरुवात केली. यातून मिळालेला पैसा व्यवसाय आणि घर खरेदीसाठी वापरला. दुसरीकडे पोलीस गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये शोध घेत होते. तपासादरम्यान, पोलिसांना तामिळनाडूमधील एक टीप मिळाली. त्याच्या मदतीने पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांनी चोरीचे सोने परत मिळवण्यासाठी तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उसिलमपट्टी भागात मोठी मोहिम सुरू केली. पोलिसांच्या पथकाने स्विमर्सच्या मदतीने ३० फूट खोल विहिरीतून लॉकर बाहेर काढले. त्यात सुमारे १५ किलो सोने होते.
दरम्यान, विहिरीत लॉकर लपवण्याचा कल्पना विजयकुमारची होती. कुणालाही संशय येऊ नये म्हणून ते लॉकर दोन वर्षांनी बाहेर काढण्याचे त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्याआधीच पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि सगळा प्रकार उघडकीस आला.