बंगळुरू - महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होते. शिंदेंसोबत ४० हून अधिक आमदार सत्ताधारी पक्षातून बाहेर पडले होते. एकनाथ शिंदे यांच्या या बंडाची चर्चा देशभरात झाली होती. शिंदेनी घेतलेल्या भूमिकेने त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली. आता त्याच एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करून भाजपाच्या बड्या नेत्याने काँग्रेस नेत्याबाबत मोठा दावा केला आहे. शेजारील कर्नाटक राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
याठिकाणी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी म्हटलं की, काँग्रेसमध्ये बरेच लोक आहेत, जे एकनाथ शिंदेंसारखे होऊ शकतात. डी.के शिवकुमार त्यातीलच एक असू शकतात असं सांगत काँग्रेसमधील दिग्गज नेते पक्षातंर्गत फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत असा दावा त्यांनी केला. आर अशोक यांनी हे विधान राज्यात शिवकुमार यांच्या भाजपाशी जवळकीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केले आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार कोयंबटूर येथील ईशा फाऊंडेशन आयोजित महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, जिथे केंद्रीय मंत्री अमित शाहही उपस्थित होते.
कर्नाटकात भाजपा नेतृत्वाच्या विधानानं सत्ताधारी काँग्रेसमधील कलह चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमधील या नाराजीला बळ देत, भविष्यात दिसणारी संधी साधून दीर्घ काळापासून काँग्रेस सरकारच्या नेतृत्वात परिवर्तन होण्याची अपेक्षा आहे असं भाजपाकडून सांगण्यात आले. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष वाढला आहे. आता प्रत्येक जण डी.के शिवकुमार यांना निशाणा बनवत आहे असं कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.वाय विजयेंद्र यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कर्नाटकात लवकरच महाराष्ट्रासारखी राजकीय उलथापालथ घडणाऱ्या गोष्टी घडतील. ज्याप्रकारे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले होते, तसेच शिवकुमार भाजपाची साथ देत आघाडी करतील आणि काँग्रेस सरकार पाडणारे नेते ठरतील असा दावा आर.अशोक यांनी केला आहे. हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असून ते डि.के शिवकुमार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू इच्छितात की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. कारण प्रयागराजच्या कुंभमेळ्यात पवित्र स्नान आणि शिवरात्रीच्या कार्यक्रमात अमित शाहांसोबत एकत्रित येणे हे काँग्रेसला रूचले नाही असंही भाजपाने सांगितले आहे.