Kapil Sibal: काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांना सपाकडून राज्यसभेची उमेदवारी; अखिलेश यांनी मारले एका दगडात दोन पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 13:01 IST2022-05-25T12:54:08+5:302022-05-25T13:01:42+5:30
Kapil Sibal Rajya Sabha Election: समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या एका निर्णयाने दोन प्रश्न सोडविले आहेत. युपीमध्ये राज्यसभेच्या ११ जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर सपाने उमेदवार उभे केले आहेत.

Kapil Sibal: काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांना सपाकडून राज्यसभेची उमेदवारी; अखिलेश यांनी मारले एका दगडात दोन पक्षी
राज्यसभा निवडणुकीत कोणाचे नशीब फळफळेल आणि कोणाला चितपट व्हावे लागेल याचे काही सांगता येत नाही. कोल्हापूरच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाला एकीकडे राज्यसभेचे तिकिट मिळालेले असताना उत्तर प्रदेशमध्ये वेगळेच राजकारण पहायला मिळत आहे. युपीमधून सपाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना तिकीट जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिब्बल यांनी १६ मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या एका निर्णयाने दोन प्रश्न सोडविले आहेत. युपीमध्ये राज्यसभेच्या ११ जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर सपाने उमेदवार उभे केले आहेत. महत्वाचे म्हणजे नाराज असलेले सपा आमदार आझम खान यांचे सिब्बल वकील होते. आझम खान आणि काका शिवपाल यादव यांच्या बंडखोरीच्या भूमिकेला अखिलेश यांनी चाप लावला आहे. शिवाय राज्यसभेतही सिब्बल यांच्या रुपाने सपाला मोठा आवाज मिळाला आहे.
शिवपाल यादव यांच्याकडून अखिलेश यांना कोणताही धोका दिसत नाहीय, परंतू आझम खान हे हातातून निसटले तर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मते दूर जातील अशी भीती आहे. यामुळे सिब्बल आझम खान यांच्यासाठी मध्यस्थी करतील अशी अपेक्षा अखिलेश यांना आहे.
कपिल सिब्बल हे आज लखनऊला पोहोचले असून ते सपामध्ये प्रवेश करणार आहेत. आजच सपाचे तिन्ही उमेदवार राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सिब्बल यांनी अर्ज दाखल केला आहे. समाजवादी पक्ष उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्या नेत्यांच्या खटल्यांमध्ये कपिल सिब्बल यांची सेवा घेतो. अखिलेश यांनी पत्नी डिंपल यादव, कपिल सिब्बल आणि जावेद अली खान यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.