अनोखा आदर्श! चहावाला बनला देवदूत; ५ हजार निराधार मुलांना शिकवलं, उचलला संपूर्ण खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:30 IST2025-01-02T16:22:55+5:302025-01-02T16:30:47+5:30

मेहबूब यांनी १३ वर्षांपूर्वी मुलांना शिक्षण देण्याचं स्वप्न पाहिलं आणि तेव्हापासून आतापर्यंत ५ हजार मुलांना मोफत शिक्षण दिलं.

kanpur tea vendor set an example taught 5 thousand destitute children | अनोखा आदर्श! चहावाला बनला देवदूत; ५ हजार निराधार मुलांना शिकवलं, उचलला संपूर्ण खर्च

अनोखा आदर्श! चहावाला बनला देवदूत; ५ हजार निराधार मुलांना शिकवलं, उचलला संपूर्ण खर्च

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये चहाचं छोटेसं दुकान असणाऱ्या व्यक्तीने एक उत्तम आदर्श समोर ठेवला आहे. मेहबूब मलिक असं या व्यक्तीचं नाव असून ते आता निराधार मुलांचा आधार बनले आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. मेहबूब यांनी १३ वर्षांपूर्वी मुलांना शिक्षण देण्याचं स्वप्न पाहिलं आणि तेव्हापासून आतापर्यंत ५ हजार मुलांना मोफत शिक्षण दिलं. मेहबूब या मुलांना वह्या-पुस्तकांपासून शाळेच्या गणवेशापर्यंतच्या सर्व सोयी-सुविधा पुरवतात. त्यांच्या कामाचा सन्मानही करण्यात आला आहे.

कानपूरच्या काकादेव येथील रहिवासी मेहबूब मलिक, शहरातील त्या सर्व निराधार मुलांसाठी देवदूत आहेत. अनेक मुलं दुसऱ्यांकडे भीक मागतात किंवा कचरा गोळा करून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं काम मेहबूब करतात. मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश आणण्याचा संकल्प मेहबूब यांनी केला आणि १२ वर्षांपूर्वी अशा मुलांना शिकवण्याची शपथ घेतली.

मेहबूब यांनी सुरुवातीला जेव्हा हे सुरू केलं तेव्हा मुलांना शिक्षणाकडे नेण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यानंतर हळूहळू मुलंही त्यांच्यासोबत जोडली जाऊ लागली. इतक्या वर्षांत त्यांनी शहरातील ५ हजार मुलांना आपल्या मोहिमेचा भाग बनवलं. त्यांनी माँ तुझे सलाम ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली, ज्यामध्ये इयत्ता १ ते ५ वी पर्यंतच्या मुलांना शिक्षण दिलं जातं. आज मेहबूब यांच्याकडे शिकणारी मुलं नंतर शहरातील नामांकित शाळांमध्ये पुढील शिक्षण घेत आहेत.

मेहबूब चहाच्या दुकानातून जे काही कमावतात, त्यातील ८० टक्के ते मुलांच्या शिक्षणासाठी देतात. त्यांच्या कार्यासाठी त्यांना तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांच्याकडून सन्मानही मिळाला आहे. जर चहा बनवणारे देशाचे पंतप्रधान होऊन देशाची सेवा करू शकतात, तर आपण हे का करू शकत नाही, असं मेहबूब म्हणतात. जास्तीत जास्त मुलांना शिक्षण देऊन शाळा बांधण्याचं त्यांचं स्वप्न आहे.
 

Web Title: kanpur tea vendor set an example taught 5 thousand destitute children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.