"जिवंत किंवा मृत... आमची मुलगी परत द्या"; ६ महिन्यांपासून लेक गायब, आई-वडिलांचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:56 IST2025-02-12T13:55:57+5:302025-02-12T13:56:42+5:30
राकेश दुबे यांची २६ वर्षीय मुलगी आकांक्षा सहा महिन्यांपूर्वी खेरेश्वर मंदिराच्या सरैया घाटावर गेली होती, त्यानंतर ती घरी परतली नाही.

फोटो - ABP News
कानपूरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या बेपत्ता मुलीचा शोध घेणाऱ्या वृद्ध पालकांना जेव्हा कोणतीही आशा दिसली नाही, तेव्हा त्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन मदतीची याचना करावी लागली. हे जोडपं डीएमच्या कार्यालयासमोर रडू लागलं आणि त्यांची मुलगी जिवंत असो वा मृत, परत मिळवून देण्याची विनंती करू लागलं. पोलीस प्रशासनाकडून त्यांचं ऐकलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. वृद्ध पालकांनी सांगितलं की त्यांची मुलगी सहा महिन्यांपूर्वी मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडली होती आणि त्यानंतर ती परतलीच नाही.
कानपूरच्या बिल्हौर भागातील उत्तरीपुरा भागात राहणारी राकेश दुबे यांची २६ वर्षीय मुलगी आकांक्षा सहा महिन्यांपूर्वी खेरेश्वर मंदिराच्या सरैया घाटावर गेली होती, त्यानंतर ती घरी परतली नाही. सीसीटीव्हीमध्ये ती ई-रिक्षातून जाताना दिसत आहे. पण तेव्हापासून तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही. वृद्ध पालक आता त्यांच्या मुलीचा फोटो गळ्यात घालून घरोघरी फिरत आहेत.
कुटुंबाने तिच्या अपहरणाची भीती व्यक्त केली होती आणि पोलिसांकडे तक्रारही दिली होती, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता, परंतु आजपर्यंत कानपूर पोलिसांना मुलीच्या शोधात काहीही सापडलेलं नाही. यामुळे हे वृद्ध जोडपं पोलिसांच्या कारवाईवर नाराज आहे आणि त्यांनी त्यांच्या सर्व आशा सोडून दिल्या आहेत. आता त्यांची एकच इच्छा आहे की त्यांची मुलगी जिवंत असो वा मृत, परत मिळावी, जेणेकरून त्यांचं दुःख आणि तिच्या जिवंत राहण्याची आशा संपेल.
वृद्ध जोडप्याने डीएम ऑफिसबाहेर जाऊन न्यायाची याचना केली आणि सीएम योगींना त्यांच्या मुलीला परत मिळवून देण्याची विनंती केली. या प्रकरणी कानपूरचे पोलीस आयुक्त अखिल कुमार यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि सांगितले आहे की, लवकरच हरवलेली मुलगी सापडेल. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.