Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:03 IST2024-08-26T13:00:55+5:302024-08-26T13:03:15+5:30
Kangana Ranaut Controversy: दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना खासदार कंगना रणौत यांनी काही मोठी विधाने केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून, आता भाजपने कंगना रणौत यांचे कान टोचले आहेत.

Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान
BJP on Kangana Ranaut's Statement: भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी केलेल्या विधानाने वादाला तोंड फुटले आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाबद्दल कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत भाष्य केले. त्यातील काही विधानावर बोट ठेवत काँग्रेससह विरोधकांनी भाजपलाच घेरलं. कंगना रणौतच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादापासून भाजपने स्वतःला बाजूला केले. त्याचबरोबर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने कंगना रणौत यांची कानउघाडणी केली.
खासदार कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत असे म्हटले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व खंबीर नसते, तर पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती तयार झाली असती.
शेतकरी आंदोलनाबद्दल काय बोलल्या खासदार कंगना रणौत?
मुलाखतीत बोलताना खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, "सगळ्यानीच बघितले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात काय झाले. आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावली गेली. तिथे बलात्कार होत होते. लोकांना मारून फासावर लटकावले जात होते. सरकारने जेव्हा तीन कृषि कायदे मागे घेतले, त्यावेळी सगळ्या उपद्रवी आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचे नियोजन खूप दीर्घकाळाचे होते."
भाजपची भूमिका काय?
कंगना रणौत यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेससह विरोधकांनी टीका केली. पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राज कुमार वेरका यांनी कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करून एनएसए कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली. कंगनाने पंजाबमधील शेतकऱ्यांना बदनाम केले. त्यांना डिब्रूगड तुरुंगात पाठवायला पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेसबरोबर इतर प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांकडून यावर टीका करण्यात आली.
भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगना रणौतच्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
"शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचे कंगनाचे काम नाही. कंगनाचे हे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या बाजूने आहे. कंगनाने अशी विधाने करू नये. असे बोलणे टाळले पाहिजे", अशी भूमिका ग्रेवाल यांनी मांडली. काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की, पंजाब भाजपने कंगना रणौतच्या या विधानाबद्दल वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली आहे.