कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:29 IST2025-10-27T17:28:24+5:302025-10-27T17:29:02+5:30
Kangana Ranaut: या वक्तव्यावर पंजाबमधील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
Kangana Ranaut: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आज पंजाबमधील बठिंडा न्यायालयात हजर झाल्या. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या वक्तव्यावर त्यांनी जाहिरपणे माफी मागितली.
काय म्हणाली कंगना?
“माझा हेतू कोणालाही दुखवण्याचा नव्हता. प्रत्येक आई माझ्यासाठी पूजनीय आहे, मग ती पंजाबची असो किंवा हिमाचलची. मी कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य केले नव्हते, फक्त एका मीमला रीपोस्ट केले होते. माझ्या बोलण्याने कुणालाही दुःख झाले असेल, मी माफी मागते,” अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.
Bathinda, Punjab: BJP MP and actress Kangana Ranaut arrives in District Court in connection with her 2021 statement on the farmers’ protest pic.twitter.com/GxTpoDQ3EP
— IANS (@ians_india) October 27, 2025
काय आहे प्रकरण ?
शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने सोशल मीडियावर एका ८७ वर्षांच्या महिला शेतकऱ्याबद्दल टिप्पणी केली होती. त्या पोस्टमध्ये तिने म्हटले होते की, “ही महिला १०० रुपये घेऊन आंदोलनात बसते.” या वक्तव्यामुळे बठिंडा जिल्ह्यातील बहादरगढ जंडियां गावातील महिला शेतकऱ्याने कंगनाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. तसेच, या वक्तव्यावर पंजाबभरात किसान संघटनांनी तीव्र विरोध केला होता.
अनेक वर्षे प्रलंबित केस
हे प्रकरण गेल्या काही वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होते. अलीकडेच सुप्रीम कोर्टाने कंगनाची याचिका फेटाळली, ज्यात तिने केस रद्द करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की, कंगनाने बठिंडा न्यायालयात हजर राहून कार्यवाहीत सहकार्य करावे.
कोर्टाचा स्पष्ट आदेश
या आधी कनिष्ठ न्यायालयाने कंगनाला अनेक वेळा समन्स पाठवले होते, परंतु प्रतिसाद मिळाला नव्हता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचा अर्जही फेटाळण्यात आला होता. पंजाब-हरियाणा हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानेही प्रकरण रद्द करण्यास नकार दिला.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हटले होते की, “कंगनाने फक्त पोस्ट शेअर केली नव्हती, तर त्या वृद्ध महिलेला लक्ष्य करत स्वतंत्र टिप्पणीही केली होती.” त्याच आदेशानुसार बठिंडा न्यायालयाने कंगनाला २७ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले होते.