कंगना, कल्याण बॅनर्जी आणि प्रियंका गांधी, संसद भवनाच्या आवारात रंगले हास्यविनोदात, नेमकं काय घडलं?
By बाळकृष्ण परब | Updated: March 27, 2025 16:15 IST2025-03-27T16:14:40+5:302025-03-27T16:15:58+5:30
Parliament Budget Session 2025: संसदेत आणि राज्यांच्या विधानभवनांमध्येही खेळीमेळीचं वातावरण क्वचितच दिसतं. या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या मकर द्वारावर बुधवारी असं दृश्य दिसलं ज्याची आता दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

कंगना, कल्याण बॅनर्जी आणि प्रियंका गांधी, संसद भवनाच्या आवारात रंगले हास्यविनोदात, नेमकं काय घडलं?
गेल्या काही काळात टोकाच्या राजकीय विरोधामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील सौहार्द जवळपास संपुष्टात आलेला आहे. राजकारणाबाहेरील मैत्री हा प्रकारही कमी झाला आहे. त्यामुळे संसदेत आणि राज्यांच्या विधानभवनांमध्येही खेळीमेळीचं वातावरण क्वचितच दिसतं. या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या मकर द्वारावर बुधवारी असं दृश्य दिसलं ज्याची आता दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
त्याचं झालं असं की, बुधवारी संसदेतून घरी जाण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी कारची वाट पाहत होते. त्याचवेळी त्यांचं लक्ष उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीला उभ्या असलेल्या भाजपा खासदार कंगना राणौत यांच्याकडे गेली. कंगना राणौत ह्यासुद्धा आपल्या गाडीची वाट पाहत होत्या. तेव्हा कंगना राणौत यांच्याकडे पाहत कल्याण बॅनर्जी म्हणाले की, आज माझा दिवस खूप चांगला आहे. भारताची ब्युटी क्विन सुद्धा इथेच आहे आहे. तेव्हा कंगना राणौत यांनी अहो दादा असं काही नाही, असं म्हणत कंगना राणौत यांना उत्तर दिलं.
कंगना राणौत आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात हास्यविनोद सुरू असतानाच तिथे काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी आल्या. त्यावेळी द मोस्ट ग्लॅमरस लेडी असं कल्याण बॅनर्जी प्रियंका गांधी यांना उद्देशून म्हणाले. त्यावर प्रियंका गांधी जोराजोरात हसल्या आणि कल्याण बॅनर्जी आणि कंगनाकडे पाहून म्हणाल्या की, नाही नाही मी ग्लॅमरस नाही, मात्र कल्याण बॅनर्जी यांनी तुम्ही ग्लॅमरस आहात असं पुन्हा एकदा सांगितलं. त्यावर प्रियंका गांधी मी ग्लॅमरस नाही असं पुन्हा म्हणाल्या आणि हसत हसत कारच्या दिशेने गेल्या.
त्यानंतर कल्याण बॅनर्जी आणि कंगना राणौत यांच्यामध्ये पुन्हा एकदा हास्यविनोद सुरू झाला. कंगना अजूनही त्यांच्या कारची वाट पाहत होत्या. संधी पाहून कल्याण बॅनर्जी म्हणाले की, तुम्ही तर ब्युटी क्विन आहात. त्यावर कंगना राणौत कल्याण बॅनर्जींना म्हणाल्या की, दादा तुमचा बुलंद आवाज संपूर्ण सभागृहात गर्जत असतो. आम्ही ऐकत असतो, तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. त्यानंतर दोन्ही खासदार हसत हसत आपापल्या घरी रवाना झाले.