KTR On Rahul Gandhi: “आंतरराष्ट्रीय नेते राहुल गांधी अमेठीत जिंकू शकले नाही, भावी पंतप्रधानांनी आधी...”; TRSचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:42 IST2022-11-02T16:40:12+5:302022-11-02T16:42:06+5:30
KTR On Rahul Gandhi: भावी पंतप्रधानांनी आधी स्वतःच्या अमेठी मतदारसंघात निवडून येण्यासाठी स्थानिकांची पसंती मिळवावी, असा टोला लगावण्यात आला आहे.

KTR On Rahul Gandhi: “आंतरराष्ट्रीय नेते राहुल गांधी अमेठीत जिंकू शकले नाही, भावी पंतप्रधानांनी आधी...”; TRSचा टोला
KTR On Rahul Gandhi: आताच्या घडीला काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. काहीच दिवसांनी ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, यातच तेलंगणा राष्ट्र समितीवरून भारत राष्ट्र समिती झालेल्या पक्षाच्या नेत्याने राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला आहे.
काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ तेलंगणात पोहचली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशनंतर ही यात्रा तेलंगणा राज्यातून प्रवास करत आहे. काही दिवसांपूर्वी के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलले होते. यावरून राहुल गांधी यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय भूमिकेचे स्वागत करतो. ते अमेरिका आणि चीनमध्ये निवडणूक लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करत आहेत, असा टोला राहुल गांधींनी लगावला होता. याला के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र के टी रामाराव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आंतरराष्ट्रीय नेते राहुल गांधी अमेठीत जिंकू शकले नाही
तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव यांनी पलटवार करताना राहुल गांधींना ‘भावी पंतप्रधान’ संबोधले आहे. आंतरराष्ट्रीय नेते राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून निवडून येऊ शकले नाहीत आणि ते मुख्यमंत्री केसीआर यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षेची खिल्ली उडवत आहेत. ‘भावी पंतप्रधान’ यांनी पहिल्यांदा खासदार म्हणून आपल्या लोकांतून निवडून यावे, अशी टीका के टी रामाराव यांनी केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं नाही. हैदराबादमध्ये पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. काँग्रेस हा निजामशाही पक्ष नाही. आठवा निजाम हैदराबादमध्ये बसला आहे, असा पलटवार काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी के टी रामराव यांच्यावर केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"