k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:37 IST2025-09-03T13:35:43+5:302025-09-03T13:37:16+5:30
K Kavitha News: के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी के. कविता हिची भारत राष्ट्र समिती पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर के. कवितांनी पक्षाकडून मिळालेल्या आमदारकीवरही लाथ मारली.

k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
K. Kavitha BRS News: भारत राष्ट्र समिती पक्षात मोठा वाद उफाळला आहे. पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी त्यांची मुलगी आणि आमदार के. कविता यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. वडिलांनीच पक्षातून बाहेर काढल्यानंतर के. कविता यांनी बुधवारी (३ सप्टेंबर) आमदारकीचा राजीनामा दिला.
के. चंद्रशेखर राव आणि मुलगी के. कविता यांच्यातील वाद मंगळवारी (२ सप्टेंबर) टोकाला पोहचला. के. कविता यांनी पक्षातील वरिष्ठ नेते हरिश राव आणि संतोष राव यांच्यावर गंभीर आरोप केले.
"हरिश राव आणि संतोष राव यांनी माझे वडील आणि बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला आहे. या कटामागे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा हात आहे", असा आरोप के. कविता यांनी केला होता.
हकालपट्टीनंतर आमदारकीचा राजीनामा
के. कविता यांना मंगळवारी (२ सप्टेंबर) के. चंद्रशेखर राव यांनी पक्षातून बडतर्फ केले. त्यानंतर बीआरएसमधील हा संघर्ष चव्हाट्यावर आला. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर के. कविता यांनी बुधवारी (३ सप्टेंबर) विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिला.
के. कविता यांनी माध्यमांना सांगितले की, मी बीआरएसचा राजीनामा देत आहे आणि माझ्या आमदारकीचा राजीनामाही विधान परिषद सभापतींकडे सुपूर्द करत आहे.
के. कविता बदलल्या, चर्चा काय?
के. कविता यांना दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटक झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यापासून त्या बदललेल्या दिसत आहेत. तेव्हापासूनच त्यांच्यात आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
तुरुंगातून सुटल्यापासून के. कविता काँग्रेस आणि रेवंत रेड्डी यांच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. जोपर्यंत रेवंत रेड्डी केसीआर यांचे नाव घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा वृत्तपत्रांमध्ये फोटो छापला जात नाही. बिहारमध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात प्रचार करू असेही त्या म्हणाल्या होत्या.
सध्या केसीआर आणि त्यांची दुसरी मुलगी केटी रामा राव एर्रावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसवर आहेत. तर के. कविता या त्यांच्या घरी आहेत. त्यांनी निलंबनानंतर लोकांना भेटणं टाळलं.