मंत्री बनताच ज्योतिरादित्य शिंदेंचे फेसबूक अकाउंट हॅक, मोदींविरोधातील जुने व्हिडिओ झाले अपलोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:26 IST2021-07-08T16:17:51+5:302021-07-08T16:26:46+5:30
Jyotiradtya Scindia's Facebook account hacked: बातमी व्हायरल होताच सायबर टीम अॅक्टिव्ह झाली आणि काही मिनीटातच हॅकिंग थांबवली

मंत्री बनताच ज्योतिरादित्य शिंदेंचे फेसबूक अकाउंट हॅक, मोदींविरोधातील जुने व्हिडिओ झाले अपलोड
ग्वालियर: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे(Jyotiraditya Scindia) यांचे फेसबूक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. काल नरेंद्र मोदी कॅबिनेटचा विस्तार झाला(Narendra Modi cabinet expansion). यात ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. पण, मंत्रीपद मिळाल्यानंतर रात्री 12.30 वाजता त्यांचे फेसबूक(Facebook) अकाउंट हॅक झाले आणि त्यावर त्यांचे मोदी आणि भाजप सरकारविरोधातील जुने व्हिडिओ अपलोड झाले.
ज्योतिरादित्य यांचे अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. बातमी व्हायरल होताच सायबर टीम अॅक्टिव्ह झाली आणि त्यांनी काही मिनीटातच हॅकिंग थांबवली. तसेच, त्यांच्या अकाउंटवरील जुने व्हिडिओही डिलीट केले. परंतु, ग्वालियर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर, भोपाळमधील शिंदे समर्थकाने या बातमीची पुष्टी केली आहे.
भाजपमध्ये सामील होताच शिंदेंना मोठी जबाबदारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात 43 नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मार्च २०२० मध्ये आपल्या समर्थक आमदारांसह ज्योतिरादित्य शिंदे भाजापमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपचे सरकार बनू शकले. त्यांच्या या कामगिरीमुळेच मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.