Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:54 IST2025-05-20T13:52:58+5:302025-05-20T13:54:53+5:30
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..."
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आधी लेकीची बाजू घेणाऱ्या ज्योतीच्या वडिलांनी आता युटर्न घेतला आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. आता तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, "मुलीच्या यूट्यूब चॅनेल किंवा परदेश दौऱ्यांबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती." ज्योती ‘Travel With Jo’ नावाचे यूट्यूब चॅनेल चालवत होती, ज्याला सुमारे चार लाख सबस्क्रायबर्स आहेत.
ती फक्त दिल्लीला गेली, असं सांगायची!
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ज्योतीचे वडील म्हणाले, "ती म्हणायची की ती दिल्लीला कामासाठी जात आहे. पण तिने मला कधी पाकिस्तान दौऱ्याबद्दल, यूट्यूबवर काय टाकते, काहीच सांगितलं नाही." याआधी एका मुलाखतीत त्यांनी स्वीकारले होते की, ज्योतीने पाकिस्तान दौरा केवळ व्हिडिओसाठी केला होता.
ज्योतीच्या वडिलांनी सांगितले की, "कोरोना पूर्वी ज्योती दिल्लीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. मात्र, लॉकडाऊननंतर ती घरात परतली आणि नंतर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली." स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात आली, ज्यामुळे तिला सहज व्हिसा मिळाला. यानंतर तिने दोनदा पाकिस्तानला भेट दिली, आणि त्या वेळेत आपल्या यूट्यूब चॅनेलवर विविध व्हिडीओ अपलोड केले.
पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीर दौरा
हिसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अगोदर ज्योती तिथे गेली होती, आणि त्यानंतर ती पाकिस्तान दौऱ्यावर रवाना झाली. पोलीस यामधील संबंध शोधत असून, ही यात्रा पूर्वनियोजित हेरगिरीचा भाग होती का, याचा तपास सुरू आहे.
ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्यातील एका व्हिडिओमध्ये ती पाक नेत्या मरियम नवाजसोबत दिसते, ज्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे. तसेच, तिच्या विविध उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतच्या भेटींचाही तपास केला जात आहे.