न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 05:35 IST2025-10-08T05:34:51+5:302025-10-08T05:35:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : न्यायालयीन कामकाजात न्यायाधीशांकडून केल्या गेलेल्या तोंडी शेऱ्यांचा, विधानांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात ...

न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : न्यायालयीन कामकाजात न्यायाधीशांकडून केल्या गेलेल्या तोंडी शेऱ्यांचा, विधानांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात असल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांनी चिंता व्यक्त केली. सोमवारी भर न्यायालयात सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट भिरकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर मंगळवारी कोर्टाचे काम सुरू असताना, हलक्याफुलक्या वातावरणात बोलताना, सरन्यायाधीश गवई यांनी एक किस्सा सांगितला.
ते म्हणाले, ‘मागील एका सुनावणीदरम्यान न्या. के. विनोद चंद्रन हे खुली निरीक्षणे, विधाने करत असताना मी त्यांना रोखले होते. आमच्यासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना माझे मित्र व सहकारी न्या. चंद्रन यांना काहीतरी टिप्पणी करायची होती; पण मी त्यांना ते व्यक्त करण्यापासून थांबवले; कारण सोशल मीडियावर आपल्या तोंडी शेऱ्यांचा, विधानांचा कसा विपर्यास केला जाईल, याची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आपल्याला जे काही बोलायचे आहे, ते माझ्याशी बोला, असा आपण त्यांना सल्ला दिला होता.’
पोलिसांचे म्हणणे काय?
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरू असताना राकेश किशोर (७१) या वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला.
‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही,’ अशा घोषणा त्या वकिलाने अटक केल्यानंतर दिल्या होत्या.
खजुराहो येथील विष्णुमूर्तीच्या पुनर्स्थापनेसंदर्भात सरन्यायाधीश यांनी टिप्पणी केली होती. त्याचा राग
मनात ठेवून राकेश किशोर याने हे
कृत्य केल्याचे पोलिसांचे
म्हणणे आहे.
बूटफेकीचा प्रयत्न केल्याचा मला पश्चात्ताप नाही; वकील राकेश किशोर
नवी दिल्ली : एका धार्मिक प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्याने मी दुखावलो गेलो. त्यामुळे मी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूटफेकीचा प्रयत्न केला. मला माझ्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, असे राकेश किशोर याने सांगितले.
राकेश किशोरने म्हटले की, सरन्यायाधीश हे उच्च संवैधानिक पद आहे. तिथे स्थानापन्न होणाऱ्या व्यक्तीला मायलॉर्ड म्हटले जाते. त्या शब्दाचा अर्थ नीट समजून घेणे व त्या पदाची प्रतिष्ठा जपणे अपेक्षित आहे. त्यांच्या काही उद्गारांनी मी खूप दुखावलो गेलो व त्यामुळे माझ्या हातून कृती घडली.
‘कृतीची मला पूर्ण जाणीव’
राकेश किशोरने सांगितले की, सरन्यायाधीशांच्या दालनात विशिष्ट कृती करताना मी मद्य किंवा कोणतेही औषध प्राशन केलेले नव्हते.
मी काय करतो आहे याची मला जाणीव होती. सरन्यायाधीशांनी एका खटल्यात केलेल्या वक्तव्यावर ती माझी प्रतिक्रिया होती. त्याचा मला पश्चाताप होत नाही किंवा मी घाबरलेलोही नाही.
आजवर मी साधे सरळ आयुष्य
जगत आलो आहे. माझ्यावर कोणताही खटला नाही तसेच हिंसेला माझा
विरोध आहे.