जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद येणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 02:23 IST2020-01-03T02:22:46+5:302020-01-03T02:23:13+5:30
दिल्लीतील निवडणुकीनंतरच बदल शक्य

जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद येणार कधी?
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पूर्णवेळ अध्यक्ष कधी केला जाणार, याविषयी संभ्रम कायम आहे. मकर संक्रांतीनंतर हा बदल केला जाईल आणि सध्याचे अध्यक्ष नंतर केवळ केंद्रीय गृहमंत्री राहतील, अशी एक चर्चा पक्षात सुरू आहे. काहींच्या मते संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून, त्यानंतरच जे.पी. नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली जातील.
गेल्या जूनमध्ये नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. अमित शहा केंद्रात मंत्री झाल्यानंतर एक व्यक्ती, एक पद या सूत्रानुसार ते अध्यक्षपद सोडणार होते; पण पक्ष संघटनेची माहिती व्हावी, यासाठी नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आणि ते नंतर अध्यक्ष होतील, असे ठरले होते.
अमित शहा अध्यक्ष असतानाच हरयाणा, महाराष्ट्र व झारखंड या राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महाराष्ट्र व झारखंड ही राज्ये हातातून गेली आणि हरयाणात अन्य पक्षांच्या मदतीने कसेबसे भाजपने सरकार स्थापन केले.
भाजपचा करिश्मा आता संपला आहे, असे त्यामुळे अनेक भाजप नेत्यांना वाटत आहे. बहुधा त्याचमुळे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधीच पक्षाध्यक्षपद सोडण्याची इच्छा शहा यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
पण तसे प्रत्यक्षात होईल का, हे स्पष्ट नाही. कारण अमित शहा यांनीच दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी प्रकाश जावडेकर, हरदीपसिंग पुरी आणि नित्यानंद राय यांची समिती नियुक्त केली आहे. दिल्लीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील; पण आपल्याला नक्की बहुमत मिळेल, याची भाजपला खात्री दिसत नाही.
पराभवाचे खापर फुटू नये
निवडणुकांआधी पद सोडण्यास शहा इच्छुक असले तरी दिल्लीतील पराभवाचे खापर आपल्यावर फुटू नये, म्हणून ते पद आता घेण्यास नड्डा तयार नाहीत, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.
म्हणूनच दिल्ली विधानसभेचे निकाल लागल्यानंतर आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर संसदेला सुटी लागेल, तेव्हा ते पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची दाट शक्यता आहे.