एक कोटी तरुणांना नोकरी, मोफत शिक्षणाचीही हमी;'एनडीए'चा जाहीरनामा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 09:30 IST2025-11-01T09:30:11+5:302025-11-01T09:30:54+5:30
एक कोटी महिलांना करणार लखपती दीदी

एक कोटी तरुणांना नोकरी, मोफत शिक्षणाचीही हमी;'एनडीए'चा जाहीरनामा प्रसिद्ध
एस. पी. सिन्हा
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शुक्रवारी आपला संयुक्त निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पटना येथील हॉटेल मौर्य येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत 'संकल्प पत्र' रुपाने हा जाहीरनामा सादर केला.
मुख्यमंत्री आणि जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, एलजेपी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान, हिंदुस्थान आवाम मोर्चा (हम) प्रमुख जीतनराम मांझी आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्यासह इतर वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. यात रोजगार, विकास, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित २५ प्रमुख आश्वासनांचा समावेश आहे.
एनडीए नेत्यांचे मौन
एनडीएच्या संयुक्त जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळी उपस्थित मुख्यमंत्री नितीशकुमार, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांच्यासह एनडीएच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी बाळगलेले मौन राजकीय चर्चेचा विषय ठरले आहे. या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीचा कार्यक्रम अगदी मोजक्या वेळेत आटोपला. शिवाय या वेळी पत्रकार परिषदेत एकाही नेत्याने भाष्य केले नाही. जाहीरनामा प्रसिद्ध केला जात असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार उठून गेले. काही कामामुळे त्यांना जावे लागल्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले.
हे खोटारडेपणाचे पॅकेज: गहलोत
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक अशोक गहलोत यांनी एनडीएच्या निवडणूक जाहीरनाम्यावर जोरदार हल्ला चढवला. हा जाहीरनामा म्हणजे 'खोटारडेपणाचे पॅकेज' असल्याचे नमूद केले. भाजपने अद्याप पूर्वी दिलेली आश्वासनेच पूर्ण केली चतप्रधानांनी बिहारसाठी १.२५ लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले, असे ते म्हणाले.
हे तर 'खोटे संकल्प पत्र' : तेजस्वी
राजद नेते तेजस्वी यादव यांनी एनडीएचा संयुक्त जाहीरनामा म्हणजे 'खोटे संकल्पपत्र' असल्याची टीका केली. यातील निम्याहून अधिक घोषणा या 'तेजस्वी प्रतिज्ञेच्या' टू कॉपी असल्याचे ते म्हणाले. इतिहासात प्रथमच एनडीएचा जाहीरनामा केवळ २६ सेकंदात प्रसिद्ध करण्यात आला. यातून या नेत्यांचा बिहारबद्दल असलेला उदासीन दृष्टिकोन दिसून येतो, अशी टीका यादव यांनी केली.
जाहीरनाम्यात कुणासाठी काय ?
महिलांसाठी : मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतची मदत. १ कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याच्या दिशेने एक पाऊल. 'महिला मिशन करोडपती'द्वारे महिला उद्योजिका होणार करोडपती.
तरुणांसाठी : १ कोटी सरकारी नोकऱ्या आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती. कौशल्य - आधारित रोजगार प्रदान करण्यासाठी कौशल्य जनगणना.
मागास घटकांसाठी : ईबीसी वर्गातील विविध व्यावसायिक गटांना १० लाख रुपयांची मदत. पंचामृत गॅरंटीअंतर्गत गरिबांना मोफत रेशन, ५ लाखांपर्यंत मोफत उपचार आणि ५० लाख पक्की घरे देणार.
शेतकऱ्यांसाठी : प्रत्येक पिकाला वाजवी किंमत, कर्पूरी ठाकूर किसान सन्मान निधी सुरू करून शेतकऱ्यांना दरवर्षी ३,००० प्रमाणे एकूण ९ हजार रुपयांचा लाभ.