कुंभमेळ्याहून परतताना खासदार महुआ माझी यांच्या गाडीला ट्रकची धडक; चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:21 IST2025-02-26T11:20:40+5:302025-02-26T11:21:15+5:30
Mahua Manjhi Accident : कुंभमेळ्यातील पवित्र स्नान आटपून पुन्हा झारखंड परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

कुंभमेळ्याहून परतताना खासदार महुआ माझी यांच्या गाडीला ट्रकची धडक; चौघे जखमी
Mahua Manjhi Accident: रांची : झारखंड मुक्ती मोर्चाच्या राज्यसभा खासदार महुआ माझी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात खासदार महुआ माझी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत गाडीत त्यांचा मुलगा आणि सूनही प्रवास करत होते. तेही जखमी झाले असून या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या कुटुंबासह खासदार महुआ माझी या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. कुंभमेळ्यातील पवित्र स्नान आटपून पुन्हा झारखंड परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. हा अपघात झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील होटवाग येथे राष्ट्रीय महामार्गावर झाला. त्यांच्या गाडीला एका ट्रकची जोरात धडक बसली. यात महुआ माझी यांच्यासह मुलगा सोमबीत माझी, सून कृती माझी आणि गाडीचालक भूपेंद्र बास्की जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर तातडीने महुआ माझी यांच्यासह सर्वांना लातेहार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात महुआ मांझी या गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, लातेहार रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी या सर्वांना रांची येथील आर्किड रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. तसेच, घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.