मुंबईत मोहम्मद अली जिनांचा आलिशान बंगला; आता मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:27 IST2025-04-19T15:25:21+5:302025-04-19T15:27:32+5:30
Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी हा बंगला बांधला होता.

मुंबईत मोहम्मद अली जिनांचा आलिशान बंगला; आता मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी 'साउथ कोर्ट' नावाचा एक आलिशान बंगला बांधला होता. भारताच्या विभाजनानंतर जिना पाकिस्तानात गेले अन् त्यांचा हा बंगला भारत सरकारच्या ताब्यात आला. आता सरकारने या बंगल्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच या बंगल्याचे नूतनीकरण केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नुतणीकरणाच्या कामासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाला या बंगल्याला एक विशेष राजनैतिक एन्क्लेव्ह बनवायचे आहे.
मुंबई हेरिटेज कंझर्वेशन कमिटी (MHCC) ने ऑगस्ट 2023 मध्ये या हेरिटेज साइटच्या नूतनीकरणाला मान्यता दिली. परराष्ट्र मंत्रालयाने हे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) कडे सोपवले असून, त्यांनी या प्रकल्पासाठी सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.
मनोरंजक गोष्ट म्हणजे, मोहम्मद अली जिनांचे हे आर्ट डेको शैलीतील घर क्लॉड बॅटली यांनी डिझाइन केले होते. बॅटली त्यावेळी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख होते.
2018 साली परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवले
पंतप्रधान कार्यालयाने 2018 मध्ये 'जिना हाऊस' म्हणून प्रसिद्ध असलेला हा बंगला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) कडून परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी सांगितले होते की, परराष्ट्र मंत्रालय दिल्लीतील हैदराबाद हाऊसप्रमाणे या बंगल्याची दुरुस्ती आणि सजावट करेल.
जिना हाऊसमध्ये अनेक अंतर्गत बदल होणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी (MHCC) कडे सादर केलेल्या प्रस्तावात जिना हाऊस बंगल्याचे निवासी जागेतून कार्यालयात रूपांतर केले जाईल आणि त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती, बदल केले जातील. कागदपत्रांनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अद्याप बंगल्याच्या कोणत्याही भागात कोणतेही बदल केलेले नाहीत किंवा पुढील बांधकाम करण्याची विनंती केलेली नाही. परंतु असे म्हटले जाते की भारताची ओळख, इतिहास आणि संस्कृती दर्शविण्यासाठी आत काही सौंदर्यात्मक बदल केले जाऊ शकतात.