एनडीएला झटका; एलजेपी स्वबळावर निवडणूक लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:05 IST2019-11-12T15:51:08+5:302019-11-20T12:05:19+5:30
मंगळवारी पार्टीने 50 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

एनडीएला झटका; एलजेपी स्वबळावर निवडणूक लढणार
रांची : झारखंडमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) फूट पडली आहे. एनडीएचा घटक पक्ष असलेली लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) स्वबळावर झारखंड विधानसभा निवडणूक लढणार आहे.
एलजेपीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी झारखंड विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी पार्टीने 50 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांची गेल्या काही दिवसांपूर्वी एलजेपीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. चिराग पासवान बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
चिराग पासवान यांनी सोमवारी झारखंड विधानसभा निवडणूक एलजेपी स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. आतापर्यंत एलजेपी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष होता. मात्र, झारखंड विधानसभा निवडणुकीत एलजेपीने सहा जागांची मागणी केली होती. परंतू रविवारी भाजपाने आपल्या 52 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यानंतर सोमवारी चिराग पासवान यांनी सांगितले की, "आम्ही झारखंड विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहोत. आम्ही भाजपाकडे सहा जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपाने रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये आम्ही मागितलेल्या जागांचा समावेश आहे."
झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. झारखंड विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्प्यात 30 नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यात 7 डिसेंबरला, तिसऱ्या टप्प्यात 12 डिसेंबरला, चौथ्या टप्प्यात 16 डिसेंबरला आणि पाचव्या टप्प्यात 20 डिसेंबरला होणार असून 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. राज्यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत. त्याशिवाय संयुक्त जनता दल, जेव्हएम, बीएसपी, एजेएसयू हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असतील.
झारखंड विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजपा - 49
एजेएसयू - 3
झारखंड मुक्ती मोर्चा - 17
काँग्रेस - 5
जेव्हीएम (पी) -1
सीपीआय (एमएल) -1
बीएसपी - 1
एमससी -1