"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:03 IST2025-07-31T10:02:24+5:302025-07-31T10:03:13+5:30
लोनचा हप्ता न भरल्याने एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेला तासन्तास बँकेत बसून ठेवल्याचा आरोप आहे.

"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोनचा हप्ता न भरल्याने एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेला तासन्तास बँकेत बसून ठेवल्याचा आरोप आहे. महिलेच्या पतीने पोलिसांना माहिती दिल्यावर ही भयंकर बाब उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेची सुटका केली.
बामहरौली गावातील आझाद नगर परिसरात एका खासगी ग्रुप लोन देणाऱ्या बँकेत ही घटना घडली आहे. पूंछ येथील रहिवासी रवींद्र वर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी पूजा वर्माला सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून जबरदस्तीने बँकेत बसवून ठेवण्यात आलं होतं. बँक कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणं सांगितलं की, जोपर्यंत पती उरलेल्या कर्जाची रक्कम जमा करत नाही तोपर्यंत महिलेला सोडलं जाणार नाही.
माहिती मिळताच पीआरव्ही पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा बँक कर्मचारी घाबरले आणि त्यांनी महिलेला बाहेर सोडलं. पोलीस चौकशीदरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी असा दावा केला की, महिला स्वतः बँकेत बसली होती आणि तिचा पती हप्ता घेण्यासाठी गेला होता. नंतर पोलिसांनी महिलेला आणि तिच्या पतीला कोतवाली मंथला पाठवलं आणि बँक कर्मचाऱ्यांनाही त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आलं.
महिलेने सांगितलं की, तिने बँकेकडून ४०,००० रुपयांचं कर्ज घेतलं होतं, ज्याचा मासिक हप्ता २,१२० रुपये होता. आतापर्यंत तिने ११ हप्ते भरले आहेत, परंतु बँकेत फक्त ८ हप्ते दाखवले जात आहेत. बँक एजंट कौशल आणि धर्मेंद्र यांनी तिच्या तीन हप्त्यांचे पैसे जमा केले नाहीत आणि ते हडप केले असा आरोप तिने केला. याप्रकरणी, कानपूर देहात येथील रहिवासी बँक व्यवस्थापक अनुज कुमार यांनी स्पष्ट केले की, महिला गेल्या ७ महिन्यांपासून हप्ता जमा करत नव्हती, म्हणून तिला बोलावण्यात आलं.
पूजा वर्माने आरोप केला की, आम्ही कर्ज घेतलं आहे. मी ११ हप्ते जमा केले आहेत, पण बँकेचे लोक म्हणत आहेत की, फक्त सात हप्ते जमा झाले आहेत. आम्ही एजंट कुशल आणि धर्मेंद्र यांच्याकडे हप्ते जमा केले आहेत. या लोकांनी माझे हप्ते मधल्या मध्ये खाऊन टाकले आहेत आणि ते जमा केलेले नाहीत. आज बँकेचे लोक माझ्या घरी आले आणि मला येथे घेऊन आले, आधी पैसे द्या, नंतर बायकोला घेऊन जा असं त्यांनी पतीला सांगितलं. त्यांनी आम्हाला ४ तास त्यांच्या ऑफिसमध्ये बसवलं. पोलीस आल्यानंतरच सुटका झाली.