हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:32 IST2025-11-06T11:30:55+5:302025-11-06T11:32:45+5:30
उत्तर प्रदेशातील झांसी येथे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील झांसी येथे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रवींद्र अहिरवार असं या तरुणाचं आहे, तो ३० वर्षांचा होता. रवींद्र झांसी येथील एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र पूर्णपणे निरोगी होता अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
सिप्री बाजार पोलीस स्टेशन परिसरातील जीआयसी मैदानावर ही हृदयद्रावक घटना घडली. रवींद्र सकाळी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. संघातील खेळाडूंनी दिलेल्या माहितीनुसार, तो बॉलिंग करत असताना त्याला तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला. पाणी पिताच त्याला त्याला अचानक उलट्या झाल्या आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. यानंतर उपचारासाठी त्याला ताबडतोब झांसी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
रवींद्रचा धाकटा भाऊ अरविंद म्हणाला की, रवींद्र पूर्णपणे निरोगी होता. तो खेळण्यासाठी घरातून निघाला होता. दोन वर्षांपूर्वी एलआयसीमध्ये विकास अधिकारी झाला होता. आमचं कुटुंब खूप आनंदी होतं. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, खेळताना तो अचानक आजारी पडला आणि काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने कुटुंब, मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
झाशी मेडिकल कॉलेजचे सीएमएस डॉ. सचिन माहोर यांनी सांगितलं की, तरुणाला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. खेळताना किंवा व्यायाम करताना अचानक जास्त पाणी प्यायल्याने देखील ही समस्या उद्भवू शकते, असंही त्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.