चालू विमानात लगावली होती पत्नीच्या कानशिलात, पायलट दाम्पत्याची जेट एअरवेजकडून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 14:35 IST2018-01-09T14:16:16+5:302018-01-09T14:35:45+5:30
विमान हवेत असताना प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत भांडणा-या दोन वरिष्ठ वैमानिकांना जेट एअरवेजने निलंबित केलं आहे. 1 जानेवारी रोजीची ही घटना आहे. लंडन - मुंबई विमानात ही घटना घडली होती.

चालू विमानात लगावली होती पत्नीच्या कानशिलात, पायलट दाम्पत्याची जेट एअरवेजकडून हकालपट्टी
नवी दिल्ली - विमान हवेत असताना प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत भांडणा-या दोन वरिष्ठ वैमानिकांना जेट एअरवेजने निलंबित केलं आहे. 1 जानेवारी रोजीची ही घटना आहे. लंडन - मुंबई विमानात ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य वैमानिकाने आपल्या महिला सहाय्यक वैमानिकाच्या कानाखाली लगावली होती. विशेष म्हणजे दोघेही पती - पत्नी होते. यानंतर महिला वैमानिक रडत कॉकपिटच्या बाहेर आली होती. एअरलाईनने दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमध्येच जोरदार भांडण झाल्यानंतर वैमानिकाने सहवैमानिकाच्या कानाखाली लगावली होती.
'लंडनहून मुंबईला जाणा-या 9W 119 या विमानात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर कॉकपिटमधील उपस्थित दोन्ही क्रू मेम्बर्सचं तात्काळ निलंबन करण्यात येत आहे', अशी माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने दिली आहे.
क्रू मेम्बर्सनी दिलेल्या जबाबानुसार, महिला सह-वैमानिक कॉकपिटमधून बाहेर आल्यानंतरही वैमानिक गोंधळ घालत होता. पत्नीला पुन्हा कॉकपिटमध्ये पाठवायला तो सांगत होता. पण जेव्हा तिने जाण्यास नकार दिला तेव्हा विमानाला ऑटो-पायलटवर टाकत तो स्वत: बाहेर आला होता.
विशेष म्हणजे या वैमानिकांच्या भांडणात विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं. ज्यावेळी वा-याच्या वेगानं विमान उड्डाण करत होते, त्यावेळी या पती-पत्नी असलेल्या वैमानिकांमध्ये कॉकपिटमध्ये भांडण झालं. या विमानात 324 प्रवासी होते. त्यातील काही प्रवासी हे झोपले होते, तर काही जागे होते. जेट एअरवेजचं विमान 9W 119 हे लंडनहून उड्डाण करून मुंबईत येत असतानाच या नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर महिला वैमानिक पाणावलेल्या डोळ्यांनी कॉकपिटच्या बाहेर येऊन रडू लागली. त्यामुळे केबिन क्रू मेंबर्सही आश्चर्यचकीत झाले. महिला वैमानिकाला अचानक का रडू कोसळलं, या प्रश्नानं सर्वच अवाक् झाले. त्यानंतर सगळीकडे चर्चा झाल्यानंतर वैमानिक असलेल्या पती-पत्नींमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं.
एअरलाईनने आधीच दोन्ही वैमानिकांवर कारवाई केली होती. आता डीजीसीएनेही दोघांचा परवाना रद्द केला आहे. दोघांनीही स्पष्टपणे विमान सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं डीजीसीएने सांगितलं आहे.