JEE Main 2020 Exam Day Guidelines, Check Here | JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. याच दरम्यान विद्यार्थ्यांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरीवर आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. जेईई विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

जेईई मेन 2020 साठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना

- कोरोना लॉकडाऊनमुळे अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेण्यात येणार आहे. योग्य ती खबरदारी घेतली जाणार असून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यामुळेच तपासणी आणि सॅनिटायझेशनसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान एक तास लवकर येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- एनटीएचे संचालक विनीत जोशी यांच्या मते, विद्यार्थ्यांना केंद्रांवर येण्यासाठी स्लॉट देण्यात येणार आहेत. स्लॉटनुसार विद्यार्थ्यांनी यावे. जेणेकरून सर्व गोष्टी सोप्या होतील. 

- परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थांना त्यांचे जेईई मेन 2020 प्रवेश पत्र आणि ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही वस्तू सोबत घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.

- परीक्षा केंद्रावर कोणत्याही पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही.

- विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले पाहिजे. परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यावर त्यांनी आपल्या सीटनंबरनुसार जागेवर बसावे. 

- पेपर २ साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असेल. वॉटर कलर वापरता येणार नाहीत.

- विद्यार्थ्यांना परिक्षेदरम्यान काही रफ वर्क करण्यासाठी एक कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी आपलं नाव लिहावं आणि नंतर परीक्षा झाल्यावर तो पेपर परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या शिक्षकांना परत करावा.

- विद्यार्थ्यांनी आपल्या हजेरीसोबतच आपला फोटो आणि स्वाक्षरी नीट आहे की नाही याची खात्री करावी. तसेच अंगठ्याचा ठसा देखील योग्य पद्धतीने दिलेला असावा. 

पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

- पालकांनी देखील काही मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं आवश्यक आहे.

- जोपर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येत नाही. तोपर्यंत पालकांनी देखील येऊ नये अशी विनंती पालकांना करण्यात आली आहे. 

- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्याची गरज असेल तरच त्यांनी यावे आणि विद्यार्थी आतमध्ये गेल्यावर निघून जावं. विनाकारण परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये.

- परीक्षा केंद्रांवर बॅरिकेट्स लावले जातील. पालकांनी या सर्व गोष्टींचं पालन करावं.

- परीक्षा केंद्रांवर जास्त गर्दी करू नये.

मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

- मधुमेहाच्या असलेल्या विद्यार्थ्यांना साखरेच्या गोळ्या आणि फळं (केळी/सफरचंद) आणि पाण्याच्या बाटली असे खाण्यायोग्य पदार्थ नेण्याची परवानगी असणार आहे.

- विद्यार्थ्यांना चॉकलेट / कँडी / सँडविच यासारख्या पॅक पदार्थांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: JEE Main 2020 Exam Day Guidelines, Check Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.