देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका ज्येष्ठ प्राध्यापकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्राध्यापकांना सेवेमधून तडकाफडकी बरखास्त करण्यात आलं आहे. या ज्येष्ठ प्राध्यापकांनी विद्यापीठात शिकणाऱ्या एका जपानी विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार जपानी दूतावासाकडून करण्यात आली होती. त्यानंतर प्राध्यापरांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित जपानी विद्यार्थिनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये संशोधन करत होती. यादम्यान, सदर ज्येष्ठ प्राध्यापक या विद्यार्थिनीला वारंवार त्रास देत होते. दरम्यान, याबाबत या विद्यार्थिनीने जपानी दूतावासाशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराबाबत कल्पना दिली होती. त्यानंतर या तक्रारीच्या आधारावर सदर प्राध्यापकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, या प्राध्यापकांविरोधात आधीही तक्रारी मिळाल्या आहेत. याबाबत जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितले की, हे प्रशासन लैंगिक शोषण आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांबाबत झीरो टॉलरन्सच्या धोरणावर विश्वास ठेवते. सदर प्राध्यापकांवर झालेली कारवाई ही विद्यापीठ परीसराची सुरक्षा आणि उत्तरदायित्वाबाबत विद्यापीठाची कठोर भूमिका दर्शवणारी आहे.