Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, CRPF जवान शहीद तर अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 19:32 IST2022-04-04T19:32:51+5:302022-04-04T19:32:59+5:30
Jammu-Kashmir: श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, ज्यात एक जवान शहीद झाला तर इतर काही जखमी झाले.

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, CRPF जवान शहीद तर अनेकजण जखमी
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये काही तासांच्या अंतरातच दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिल्या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले. दुसऱ्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी गैर काश्मिरींवर गोळीबार केला. यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिला हल्ला श्रीनगरच्या लाल चौकातील मैसुमा भागात झाला. तिथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या दोन जवानांना गोळ्या घातल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, त्यापैकी एका जवानाला प्राण गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवानही जखमी झाले आहेत. यानंतर परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे.
दुसरा हल्ला पुलवामाच्या लाजुराह गावात झाला. तिथे दहशतवाद्यांनी दोन गैर-काश्मीरींवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
मोठा शस्त्रसाठा जप्त
तिकडे, सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ एका गावात लपून बसलेल्या एका दहशतवाद्याचा पर्दाफाश केला आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला. हवेली तहसीलच्या नूरकोट गावात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान हा ठावठिकाणा सापडला. जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्यामध्ये दोन मॅगझिनसह दोन एके-47 रायफल आणि 63 राउंड, 223 बोअरची एके आकाराची बंदूक, दोन मॅगझिन आणि 20 राउंड आणि एक चिनी पिस्तूल यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.