जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 18:53 IST2021-12-10T18:53:13+5:302021-12-10T18:53:31+5:30
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांच शोध सुरू आहे.

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांना वीरमरण
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपोरीमधील गुलशन चौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला, यात मोहम्मद सुलतान आणि फयाज अहमद जखमी झाले होते. त्या दोघांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काश्मीर झोन पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी परिसराची नाकाबंदी केली आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट केले की, उत्तर काश्मीरमधील बांदीपूर भागात पोलिसांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचारी मोहम्मद सुलतान आणि फयाज अहमद यांना प्राण गमवावे लागले. देव आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो.
#Terrorists fired upon a police party at Gulshan Chowk area of #Bandipora. In this #terror incident, 02 police personnel namely SgCT Mohd Sultan & Ct Fayaz Ahmad got injured & attained #martyrdom. Area cordoned off. Further details shall follow. @JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 10, 2021
तीन दहशतवादी चकमकीत ठार
यापूर्वी ८ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शोपियांच्या चक-ए-चोलन गावात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू केली.
यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही बाजूंनी दिवसभर चाललेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. अमीर हुसैन, रईस अहमद आणि हसीब युसूफ अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची पोलिसांनी ओळख पटवली आहे.