"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:27 IST2025-08-27T12:26:18+5:302025-08-27T12:27:30+5:30

कटरा येथील माता वैष्णोदेवी मार्गावर मंगळवारी अचानक झालेल्या भूस्खलनात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

jammu kashmir katra mata vaishno devi landslide deaths rescue operation know what happened | "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?

फोटो - ndtv.in

जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊस, पूर, ढगफुटीमुळे कहर झाला आहे, तर दुसरीकडे भूस्खलनामुळे परिस्थिती वाईट आहे. कटरा येथील माता वैष्णोदेवी मार्गावर मंगळवारी अचानक झालेल्या भूस्खलनात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात्रा मार्गावरील अर्धकुवारीजवळील उतारावरून दगड, झाडं पडल्याने मोठी दुर्घटना घडली. 

मंगळवारी दुपारी ३ वाजता मंदिराकडे जाताना ही दुर्घटना घडली. पंजाबच्या मोहाली येथील रहिवासी किरण देखील भूस्खलनात अडकलेल्यांमध्ये होती. तिने त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. किरणने कटरा येथील एका रुग्णालयात पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, "मी दर्शनानंतर टेकडीवरून खाली येत असताना लोक ओरडू लागले. मी दगड पडताना पाहिले. मी सुरक्षित ठिकाणी पोहोचले, पण मला दुखापत झाली."

दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेल्या एका मुलीने सांगितलं की, आमचा पाच लोकांचा ग्रुप होता, त्यापैकी तीन जण जखमी आहेत. घटनेनंतर मुलगी धक्क्यात आहे. काही जखमींना जम्मूपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या कटरा येथील नारायण रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. लष्कर आणि एनडीआरएफ कटरा आणि आसपासच्या परिसरात बचाव आणि मदतकार्य करत आहे.

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर अर्धकुंवारीजवळ झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ३० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, अनेकजण जखमी झाले, अशी माहिती रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक परमवीर सिंह यांनी बुधवारी सकाळी दिली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली.

Web Title: jammu kashmir katra mata vaishno devi landslide deaths rescue operation know what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.