जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:44 IST2025-08-13T11:44:21+5:302025-08-13T11:44:33+5:30
Jammu-Kashmir: सैन्याने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात वेढा घातला आहे.

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
Jammu-Kashmir: स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. अशातच, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या दरम्यान झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमध्ये एका आठवड्यातील ही दुसरी मोठी घटना आहे, ज्यामध्ये लष्कराचे जवान शहीद झाले आहेत. सध्या बारामुल्ला आणि उरी सारख्या संवेदनशील भागात शोध मोहीम सुरू आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील चिरुंडा गावात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सुरक्षा दलांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवादी आणि सैन्यातील चकमकीत एक जवान शहीद झाला. चकमक अजूनही सुरू असून, सैन्याने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात चकमकी झाल्या आहेत.
३ ठिकाणी चकमकी
एक आठवड्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड, कठुआ, बारामुल्ला येथे एकाच वेळी ३ ठिकाणी चकमकी झाल्या. बारामुल्लाच्या चक टप्पर क्रीरी पट्टन भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांना ठार मारले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा देखील जप्त केला आहे. तर, दुर्दैवाने २ जवान शहीद झाले, तर इतर दोघे जखमी झाले.