उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 20:06 IST2025-12-15T20:04:21+5:302025-12-15T20:06:15+5:30
Jammu-Kashmir: येथील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली आहे.

उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील सोन गावाच्या जंगलात सोमवारी(दि.15) सायंकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची पुष्टी आयजीपी जम्मू यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून केली आहे.
दहशतवादी घरात लपले, परिसराला घेरले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दहशतवादी गावातील एका घरात लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असून, तात्काळ कारवाई करत संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. अंधार पडल्यामुळे कारवाई तुर्तास थांबवण्यात आला आहे. पहाटे शोधमोहीम पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
डोडामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याची मालमत्ता जप्त
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक मोहिमेअंतर्गत, पोलिसांच्या राज्य तपास एजन्सीने (SIA) बुधवारी डोडा जिल्ह्यात पाकिस्तानस्थित हिजबुल मुजाहिदीनच्या एका सक्रिय दहशतवाद्याची मालमत्ता जप्त केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जाहिद हुसैन या हिजबुल दहशतवाद्याची डोडा जिल्ह्यातील मंगोटा गावात असलेली जमीन जप्त करण्यात आली.
तरुणांना दहशतवादी कारवायात ओढल्याचा आरोप
जाहिद हुसैन हा 2000 मध्ये बेकायदेशीररीत्या पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर तो प्रतिबंधित हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा स्वयंघोषित कमांडर बनून सीमेपलिकडून राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कारवाया करत आहे. त्याच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढल्याचा आरोप आहे.