दहशतवादी हल्ल्यात झाला होता वडील आणि काकांचा मृत्यू, आता भाजपाने दिली उमेदवारी, कोण आहेत शगून परिहार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:20 IST2024-08-26T15:20:22+5:302024-08-26T15:20:57+5:30
Jammu & Kashmir Assembly Election 2024: जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमधून १५ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या १५ उमेदवारांमध्ये शगून परिहार यांच्या नावाचाही समावेश आहे.

दहशतवादी हल्ल्यात झाला होता वडील आणि काकांचा मृत्यू, आता भाजपाने दिली उमेदवारी, कोण आहेत शगून परिहार?
जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमधून १५ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या १५ उमेदवारांमध्ये शगून परिहार यांच्या नावाचाही समावेश आहे. शगून यांना किश्तवाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या उमेदवारी यादीमधील शगून यांचं नाव अनेक अर्थांनी खास आहे. त्याचं कारण म्हणजे आज जाहीर करण्यात आलेल्या १५ उमेदवारांमधील त्या एकमेव महिला आहेत.
शगून परिहार ह्या भाजपाचे जम्मू-काश्मीरमधील माजी सचिव अनिल परिहार यांची पुतणी आहेत. अनिल परिहार आणि त्यांचे बंधू अजित परिहार (शगून यांचे वडील) यांची नोव्हेंबर २०१८ मध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर शगून परिहार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि समर्थन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
शगून परिहार म्हणाल्या की, किश्तवाडमधील लोक किश्तवाडच्या या लेकीला खुल्या मनाने स्वीकारतील, असा मला विश्वास आहे. ही निवडणूक केवळ कुटुंबासाठी नाही, केवळ परिहार बांधवांसाठी नाही तर त्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं, त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. मी आता जास्त काही बोलू शकत नाही. मी खूप भावूक झाली आहे. मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला माझ्या वडिलांची सर्वाधिक आठवण झाली. मी यापेक्षा अधिक काही बोलू शकत नाही.