2 डॉक्टर, 5 दहशतवादी अन् 2900 किलो स्फोटके; सर्वात मोठ्या दहशतवादी कटाची इनसाइड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:36 IST2025-11-10T17:35:07+5:302025-11-10T17:36:25+5:30
Jammu Kashmir Police: जम्मू-कश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गझवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.

2 डॉक्टर, 5 दहशतवादी अन् 2900 किलो स्फोटके; सर्वात मोठ्या दहशतवादी कटाची इनसाइड स्टोरी
Jammu Kashmir Police: जम्मू-कश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अंसार गझवत-उल-हिंद (AGuH) या दहशतवादी संघटनांशी संबंधित आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक केली असून 2,900 किलो आयईडी तयार करण्याचे साहित्य आणि दोन AK सीरिज रायफल्स जप्त केल्या आहेत.
2900 किलो स्फोटक साहित्याचा मोठा साठा
जम्मू-कश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक तयार करण्याचे साहित्य जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये फरीदाबादचा डॉक्टर मुआझमिल अहमद गनई आणि कुलगामचे डॉक्टर आदिल यांचा समावेश आहे. चौकशीत समोर आले की, हे दोघे परदेशी हँडलर्सच्या संपर्कात होते आणि शैक्षणिक व सामाजिक नेटवर्कच्या माध्यमातून निधी उभारणी करत होते.
‘व्हाईट कॉलर टेरर नेटवर्क’चा उलगडा
पोलिसांच्या मते, हे नेटवर्क अत्यंत संगठित आणि बुद्धिजीवी लोकांच्या माध्यमातून चालवले जात होते. यात काही प्रोफेशनल्स, धार्मिक विद्वान आणि विद्यार्थी सहभागी होते. ते एन्क्रिप्टेड चॅनेल्सच्या माध्यमातून विचारधारा पसरवणे, निधी हालचाल आणि शस्त्र पुरवठ्याचे काम करायचे.
असा झाला खुलासा
19 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीनगरच्या बुनपोरा नौगाम परिसरात जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर्स सापडले होते, ज्यात पोलिस आणि सुरक्षा दलांना धमक्या देण्यात आल्या होत्या. याच प्रकरणावर आधारित FIR क्रमांक 162/2025 नौगाम पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. यानंतर तपासात समोर आले की, हे नेटवर्क काश्मीरपासून हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेले आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे
- आरिफ निसार डार उर्फ साहिल - नौगाम, श्रीनगर
- यासिर-उल-अशरफ - नौगाम, श्रीनगर
- मकसूद अहमद डार उर्फ शाहिद - नौगाम, श्रीनगर
- मौलवी इरफान अहमद (मशिदीचा इमाम) - शोपियां
- जमीर अहमद अहांगर - गंदरबल
- डॉ. मुआझमिल अहमद गनई - पुलवामा
- डॉ. आदिल - कुलगाम
फरीदाबादमध्ये डॉक्टर अटकेत
डॉ. मुआझमिल गनईला फरीदाबादमध्ये भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 360 किलो अमोनियम नायट्रेट, AK-56 रायफल, AK Krinkov, बेरेटा आणि चीनी स्टार पिस्तूलसह शेकडो कारतूस जप्त करण्यात आले. पोलिसांच्या मते, हे नेटवर्क ‘सोशल वेलफेअर’च्या नावाखाली निधी उभारून दहशतवादी कारवायांमध्ये खर्च करत होते. तपासात उघड झाले की, हे नेटवर्क पाकिस्तान आणि इतर देशांतून चालवल्या जाणाऱ्या हँडलर्सशी थेट संपर्कात होते.