जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 22:09 IST2025-11-11T22:08:23+5:302025-11-11T22:09:39+5:30
फरीदाबादमध्ये नुकत्याच जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात, शोपियानमधून मुफ्ती इरफान अहमद याला अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळवले आहे. फरीदाबादमध्ये नुकत्याच जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात, शोपियानमधून मुफ्ती इरफान अहमद याला अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'अंसार गजवत-उल-हिंद' यांच्या आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय मॉड्यूलचा पर्दाफाश या कारवाईतून झाला आहे. डॉ. मुजम्मिलसह पोलिसांनी ज्या ७ प्रमुख आरोपींची नावे जाहीर केली होती, त्यामध्ये या मुफ्ती इरफानचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीरसह हरियाणातील फरीदाबाद आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूरपर्यंत या दहशतवादी मॉड्यूलचे जाळे पसरलेले होते.
१९ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीनगरमधील बनपोरा नौगाम परिसरात जैश-ए-मोहम्मदचे अनेक पोस्टर चिकटवलेले आढळले होते. या पोस्टर्समधून सुरक्षा दलांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी UAPA कायद्याच्या विविध कलमांखाली (कलम १३, १६, १७, १८, १९, २०, २३, ३९, ४०) आणि शस्त्र अधिनियम, स्फोटक पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
या तपासात पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांमध्ये एकत्रित शोधमोहीम राबवून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा साठा जप्त केला.
एन्क्रिप्टेड चॅनेल्सद्वारे टेरर फंडिंग!
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी मॉड्यूल आपली विचारधारा पसरवण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी, पैशांचे व्यवहार आणि लॉजिस्टिक्ससाठी एन्क्रिप्टेड चॅनेल्सचा वापर करत होते. तसेच, सामाजिक आणि धर्मादाय कार्यांच्या नावाखाली, शैक्षणिक आणि व्यावसायिक नेटवर्कचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशांची जमवाजमव केली जात होती. दहशतवादी गटांसाठी निधी गोळा करणे, तरुणांना कट्टरपंथी बनवून त्यांची भरती करणे, तसेच शस्त्रे, दारूगोळा आणि IED तयार करण्यासाठी साहित्य खरेदी करणे हा होता.
पोलिसांच्या ताब्यात आलेले ७ मुख्य आरोपी
फरीदाबाद स्फोटक प्रकरणात आणि दहशतवादी मॉड्यूलच्या भंडाफोरात आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले ७ प्रमुख आरोपी खालीलप्रमाणे आहेत-
> आरिफ निसार डार उर्फ साहिल (निवासी: नौगाम, श्रीनगर)
> यासिर-उल-अशरफ (निवासी: नौगाम, श्रीनगर)
> मकसूद अहमद डार उर्फ शाहिद (निवासी: नौगाम, श्रीनगर)
> मौलवी इरफान अहमद (मशिदीचा इमाम, निवासी: शोपियां) – नवीन अटक.
> जमीर अहमद अहंगर उर्फ मुत्लाशा (निवासी: गांदरबल)
> डॉ. मुजम्मिल अहमद गनी उर्फ मुसैब (निवासी: कोइल, पुलवामा)
> डॉ. आदिल (निवासी: वानपोरा, कुलगाम)
याव्यतिरिक्त, तपास अजूनही सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगर, अनंतनाग, गांदरबल आणि शोपियांसह हरियाणा पोलिसांच्या मदतीने फरीदाबादमध्ये आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने सहारनपूरमध्येही अनेक ठिकाणी कसून शोध घेतला आहे. या तपासामुळे आणखी काही व्यक्तींची भूमिका समोर येण्याची शक्यता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.