Jammu and Kashmir: स्वातंत्र्य दिनी हल्ल्याचा कट उधळला, 'जैश'च्या चार दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 14:17 IST2021-08-14T14:16:05+5:302021-08-14T14:17:09+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावण्यात पोलीस दलाला मोठं यश आलं आहे.

Jammu and Kashmir: स्वातंत्र्य दिनी हल्ल्याचा कट उधळला, 'जैश'च्या चार दहशतवाद्यांना अटक
स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी जम्मू-काश्मीरमध्येदहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावण्यात पोलीस दलाला मोठं यश आलं आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी जैशच्या षडयंत्राचा भांडाफोड करत चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्वातंत्र्य दिनी मोटारसायकवर आयईडी स्फोटकांचा वापर करुन हल्ला करण्याचा मनसुबा जैशच्या दहशतवाद्यांनी आखला होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आलं आहे.
जम्मू-काश्मीरचं सुरक्षा दल गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्याविरोधात शोध मोहिम राबवत आहे. याअंतर्गत जम्मू पोलिसांनी जैशच्या चार दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. ड्रोनच्या माध्यमातून आणण्यात आलेली हत्यारं आणि स्फोटकं जमा करण्यासाठी व ती जैशच्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्लान आखला जात होता. यासोबतच उद्या म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मोटारसायकलमध्ये आयईडी स्फोटकं लावून स्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता. देशातील इतर काही शहरांनाही लक्ष्य करण्याचं प्लानिंग केलं जात होतं, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी सर्वात आधी मुंतजिर मंजूर याला अटक केली. मुंतजिर पुलवामाचा रहिवासी असून तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. मुंतजिरकडून एक पिस्तल, ८ राऊंड काडतुसं आणि दोन चिनी हँड ग्रेनेड जप्त करण्यात आली आहेत. शस्त्रांची ने-आण करण्यासाठी वापरणाऱ्या येणारा एक ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे.
मुंतजिरला अटक केल्यानंतर आणखी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. तौफिक अहमद शाह या शोपियां जिल्ह्यात राहणाऱ्याला अटक करण्यात आली. पाकिस्तानात बसलेल्या जैशचा कमांडर शाहिद आणि अबरार यांनी तौफिकला जम्मूला पोहोचण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तो जम्मूत आला होता. त्यानंतर त्याला बॉम्बस्फोट करण्यासाठी मोटारसायकल खरेदी करण्यास सांगण्यात आलं होतं. यासाठी आयईडी ड्रोनच्या माध्यमातून पाठविण्यात येणार होता. पण तौफिक असं काही करण्याआधीच त्याला अटक करण्यात आली आहे.
तिसरा दहशतवादी जहांगीर अहमद भट्ट देखील पुलवामाचा रहिवासी आहे. यालाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जहांगीर काश्मीरमधील एक फळ विक्रेता असून तो सातत्यानं जैशचा कमांडर शाहिद याच्यासोबत संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. काश्मीर घाटीत तरुणांना जैशमध्ये भरती करण्याचं काम तो पाहत होतो.