"शपथविधीनंतर नितीश राजभवनात परतले; राज्यपाल म्हणाले- अजून 15 मिनिटेही झालेली नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:26 IST2024-01-29T16:24:42+5:302024-01-29T16:26:05+5:30
Jairam Ramesh Slams Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.

"शपथविधीनंतर नितीश राजभवनात परतले; राज्यपाल म्हणाले- अजून 15 मिनिटेही झालेली नाहीत"
Jairam Ramesh Slams Nitish Kumar (Marathi News) : विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीचा भाग असलेल्या नितीश कुमारांनी (Nitish Kumar) अचानक NDA सोबत सरकार स्थापन केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नितीश यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतल्यापासून सर्व विरोधी पक्ष त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
शपथ लेने के बाद नीतीश कुमार जी अपना मफलर राज भवन में भूल गये।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) January 29, 2024
आधे रास्ते से वापिस लौटकर लेने आए तो राज्यपाल जी चौंक गए कि इस बार तो 15 मिनट भी नहीं हुए।
जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार त्यांचा मफलर राजभवनात विसरले होते. मफलर परत घेण्यासाठी नितीश परत राजभवनात गेले, त्यांना पाहून राज्यपालांना धक्काच बसला आणि ते म्हणाले, अजून 15 मिनिटेही उलटली नाहीत,' असा टोमणा जयराम रमेश यांनी त्यांना लगावला.
नितीश म्हणजे 'आया कुमार, गया कुमार'
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. नितीश कुमार हे 'आया राम, गया राम' नसून ते 'आया कुमार, गया कुमार' आहेत. नितीश कुमारांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.