जयपूरमधील सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या एसएमएस रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंटू गुर्जर याचाही समावेश होता. पिंटू गुर्जर याच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, "मी स्वतः माझ्या भावाचा मृतदेह आतून बाहेर काढला. आम्हाला आत जाऊ देत नव्हते. जर आम्हाला आत जायला दिलं असतं तर मी माझ्या भावाला बाहेर काढलं असतं."
"रुग्णालयात इतका धूर होता की कोणीही एक सेकंदही आत राहू शकत नव्हतं. आज माझ्यासोबत असं घडलं आणि उद्या दुसऱ्या कोणासोबतही असं घडेल. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे काल रात्री आले होते. पण ते कोणालाही भेटले नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आत जाऊ दिलं नाही. रुग्णालयात सुरक्षा आणि अग्निसुरक्षा उपकरणांचा अभाव असल्याने आम्हाला चौकशी आणि कारवाई हवी आहे."
"माझ्या भावाचा मृत्यू झाला"
पिंटू गुर्जरचा भाऊ ओम प्रकाश म्हणाला की, "माझा भाऊ २४-२५ वर्षांचा होता. अपघातात त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज दिला जाईल. तुमचा भाऊ आता बरा होत आहे. रविवारी रात्री ११ ते ११:३० च्या दरम्यान आग लागली आणि माझ्या भावाचा मृत्यू झाला."
"संपूर्ण रुग्णालयाला आग लागली"
"आम्ही रुग्णालयातील खोली क्रमांक ७ मध्ये होतो. अचानक एक ठिणगी पडली. मी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. डॉक्टरांनी खिडकी उघडली आणि एक्झॉस्ट चालू केला. पण काही वेळातच आणखी एक ठिणगी दिसली आणि आग वाढत गेली. सर्वात आधी धूर आला आणि नंतर संपूर्ण रुग्णालयाला आग लागली. मी आतून दोन लोकांना वाचवलं, परंतु मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही आणि त्याचा मृत्यू झाला."
सात जणांचा मृत्यू
ट्रॉमा सेंटरचे प्रभारी डॉ. अनुराग धाकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टोरेज एरियामध्ये आग लागली तेव्हा न्यूरो आयसीयूमध्ये ११ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांनी सांगितलं की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. इतर चौदा रुग्णांना वेगळ्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं."
Web Summary : Jaipur hospital fire killed seven. A brother recounts pulling his deceased brother from the ICU. He alleges negligence, inadequate safety measures, and lack of official support. Short circuit suspected as the cause.
Web Summary : जयपुर के अस्पताल में आग लगने से सात की मौत। एक भाई ने आईसीयू से अपने मृत भाई को निकालने का वर्णन किया। उसने लापरवाही, अपर्याप्त सुरक्षा उपायों और आधिकारिक समर्थन की कमी का आरोप लगाया। शॉर्ट सर्किट का संदेह।