भयंकर! आगीच्या ज्वाळांनी वेढलेला माणूस मदतीसाठी ओरडत होता; लोक काढत राहिले Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:48 IST2024-12-21T16:47:49+5:302024-12-21T16:48:37+5:30

गॅस टँकर अपघातातील मृतांची संख्या १४ वर पोहोचली. या अपघातात जखमी झालेले ३० हून अधिक लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.

jaipur gas tanker explosion man radheyshyam choudhary in flames walked 600m seeking help people made video | भयंकर! आगीच्या ज्वाळांनी वेढलेला माणूस मदतीसाठी ओरडत होता; लोक काढत राहिले Video

फोटो - ABP News

राजस्थानच्या जयपूरमध्ये शनिवारी गॅस टँकर अपघातातील मृतांची संख्या १४ वर पोहोचली. या अपघातात जखमी झालेले ३० हून अधिक लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. याच दरम्यान, आगीत होरपळलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जळत असलेला एक माणूस स्फोटानंतर स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तो मदतीसाठी ओरडत होता.

आगीच्या ज्वाळांनी वेढलेला व्यक्ती मदत मिळावी म्हणून ६०० मीटर चालत गेला, पण कोणीच मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. लोकांनी फक्त त्याचा व्हिडीओ बनवला. जयपूरमधील नॅशनल बियरिंग्ज कंपनी लिमिटेडमध्ये मोटार मेकॅनिक असलेले राधेश्याम चौधरी नेहमीप्रमाणे आपल्या घरातून मोटारसायकलवरून निघाले होते, त्यांना कल्पनाही नव्हती की, दोन किलोमीटर पुढे अशी धक्कादायक घटना घडेल. 

TOI च्या रिपोर्टनुसार, राधेश्याम यांचे मोठे भाऊ अखेराम यांना सकाळी ५.५० वाजता एका अनोळखी व्यक्तीने या घटनेबद्दल सांगितलं, "ताबडतोब हिरापुरा बस टर्मिनलवर या. तुमचा भाऊ अडचणीत आहे." यानंतर अखेराम दोन शेजाऱ्यांसह अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. "माझा भाऊ रस्त्यावर पडलेला होता, लोकांनी मला सांगितलं की, तो स्फोटाच्या ठिकाणापासून सुमारे ६०० मीटर चालत आला" असं अखेराम यांनी म्हटलं आहे.

"माझा भाऊ रस्त्यावर धडपडत होता आणि मदतीसाठी ओरडत होता, परंतु मदत करण्याऐवजी, बहुतेक लोक फक्त व्हिडीओ बनवत होते. आम्ही रुग्णवाहिकेची वाट पाहिली नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने भावाला गाडीतून रुग्णालयात नेलं. तो शुद्धीत होता. असह्य वेदना होत असताना देखील त्याला माझा नंबर पाठ होता.  आम्हाला वाटलं होतं की तो वाचेल पण तो ८५% भाजला होता" असंही अखेराम यांनी सांगितलं. 
 

Web Title: jaipur gas tanker explosion man radheyshyam choudhary in flames walked 600m seeking help people made video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.