भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:57 IST2025-05-17T13:56:52+5:302025-05-17T13:57:39+5:30
जयपूरमधून स्टंटबाजीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे.

भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
राजस्थानची राजधानी जयपूरमधून स्टंटबाजीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. कारमधील तरुणाने जाणूनबुजून रस्त्यावरील चार जणांना चिरडलं आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कार चालक वेगाने कार चालवून स्टंट करत होता आणि त्यानंतर त्याने रस्त्यावरील काही तरुणांना धडक दिली. कारमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या तरुणाने या घटनेचा व्हिडीओ बनवला, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे तरुणांना चिरडल्यानंतरही चालकाने कार थांबवली नाही आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा काही तरुण रस्त्याच्या कडेला उभे होते. अचानक एक पांढऱ्या रंगाची कार वेगाने आली आणि त्यांना धडकली.
#Horrible
— अभिषेक 'अजनबी' ✍🏻 (@abhishekAZNABI) May 17, 2025
जयपुर में कार से की स्टंटबाजी, सड़क पर जा रहे चार युवकों को रौंदा…!
घटना का खौफनाक VIDEO वायरल...!#ViralVideospic.twitter.com/LiJIHk0tdZ
मिळालेल्या माहितीनुसार, जगतपुरा परिसरात ही घटना घडली आहे. कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांमुळे रस्त्यावर गोंधळ उडाला. याच दरम्यान भरधाव वेगाने स्टंट करत असताना कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार तरुणांना चिरडलं. कार त्यांच्या दिशेने येत असल्याचं पाहून इतर लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले.
सांगानेरचे एसीपी विनोद कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओच्या आधारे कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांची ओळख पटवली जात आहे. रामनगरिया पोलीस ठाण्याचं एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेबाबत कोणतीही तक्रार मिळालेली नाही, परंतु पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सुदैवाने चारही तरुणांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कारमध्ये बसलेले तरुण अपशब्द वापरत असल्याचं देखील समोर येत आहे.