फॅन्सी नंबर प्लेटसाठी उद्योगपतीनं मोजली 'इतकी' रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 15:37 IST2018-05-21T15:37:09+5:302018-05-21T15:37:09+5:30

रक्कम वाचाल, तर चक्रावून जाल

jaipur businessman spends rs 16 lakh fancy number plate | फॅन्सी नंबर प्लेटसाठी उद्योगपतीनं मोजली 'इतकी' रक्कम

फॅन्सी नंबर प्लेटसाठी उद्योगपतीनं मोजली 'इतकी' रक्कम

जयपूर: आपल्या गाडीचा नंबर लक्षवेधी असावा, असं सर्वांनाच वाटतं. काहीजणांना असा नंबर मिळतो. तर काहीजण अधिक रक्कम मोजून असा नंबर मिळवतात. मात्र जयपूरमधील एका उद्योगपतीनं फॅन्सी नंबर प्लेटसाठी तब्बल 16 लाख रुपये मोजले आहेत. उद्योगपती राहुल तनेजा यांनी त्याच्या जॅग्वार एक्सजे एलसाठी 1 क्रमांक असलेली नंबर प्लेट विकत घेतली आहे. 

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, राहुल यांनी 25 मे रोजी नवी कार खरेदी केली. त्यांना या गाडीसाठी 1 क्रमांकाची नंबर प्लेट हवी होती. या क्रमांकासाठी संपूर्ण राज्यातून अनेकांनी बोली लावली होती. यापैकी सर्वाधिक बोली राहुल यांनी लावली होती. राहुल यांनी दीड कोटी रुपयांना जॅग्वार खरेदी केली होती. एक क्रमाकांच्या नंबर प्लेटसाठी त्यांनी एक ते दीड महिना वाट पाहिली. 

37 वर्षांच्या राहुल तनेजा यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. राहुल यांनी 1996 मध्ये एक सेकंड हँड स्कूटर खरेदी केली होती. तिचा क्रमांक RJ 14 23M 2323 असा होता. या आकड्यांची बेरीज (2+3+2+3=10; 1+0=1) 1 अशी होते. तेव्हापासूनच एक हा राहुल यांचा लकी क्रमांक झाला. मला कायमच नंबर 1 राहायला आवडतं, असं राहुल यांनी सांगितलं. जॅग्वारसोबतच त्यांच्याकडे BMW 5 सीरिजमधील गाडी आहे. ती त्यांनी 2011 मध्ये खरेदी केली होती. या गाडीच्या क्रमांकातही 1 आकडा आहे. या गाडीचा क्रमांक RJ 14 CP 0001 असा आहे. यासाठीही त्यांनी 10.31 लाख रुपये मोजले होते. याशिवाय त्यांच्याकडे स्कोडा लॉरादेखील आहे. तिचा क्रमांक RJ 20 CB 0001 असा आहे. 
 

Web Title: jaipur businessman spends rs 16 lakh fancy number plate