जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती; राष्ट्रपतिपदानंतर एनडीएचा आणखी एक विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 06:01 IST2022-08-07T06:01:08+5:302022-08-07T06:01:14+5:30

शनिवारी झालेल्या निवडणुकीत ७२५ खासदारांनी मतदान केले.

Jagdeep Dhankhad the new Vice President; Another win for NDA after the presidency | जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती; राष्ट्रपतिपदानंतर एनडीएचा आणखी एक विजय

जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती; राष्ट्रपतिपदानंतर एनडीएचा आणखी एक विजय

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनखड यांना ५२८ तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली. ११ ऑगस्टला धनखड उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतील. अलीकडेच झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांचा विजय झाला होता. 

शनिवारी झालेल्या निवडणुकीत ७२५ खासदारांनी मतदान केले. त्यातील १५ मते अवैध ठरली. ५५ खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदार यासाठी मतदान करतात. सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले. संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी सुरु झाली. दोन तासांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. 

सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी

१९९७ पासून उपराष्ट्रपतिपदासाठी सहा निवडणुका झाल्या, त्यातील विजयी उमेदवारांच्या मतांच्या फरकाचा विचार केल्यास धनखड यांनी सर्वात माेठा विजय नोंदवला आहे.

दोन्ही सभागृहांची सूत्रे राजस्थानातील नेत्यांकडे

संसदेच्या दोन्ही सभागृहांची सूत्रे आता राजस्थानचे मूळ रहिवासी असलेल्या नेत्यांच्या हाती असतील. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानातील भाजप नेते आहेत. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकलेले धनखड हे राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील किठाना या गावचे मूळ रहिवासी आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. त्यामुळे राज्यसभेची सारी सूत्रे आता धनखड यांच्याकडे असणार आहेत.

Web Title: Jagdeep Dhankhad the new Vice President; Another win for NDA after the presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.