३० कोटींचा मालक निघाला महसूल अधिकारी; ७ वर्षांत जमा केल्या ४१ मालमत्ता, २९ वर्षे केली एकाच ठिकाणी ड्युटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:35 IST2025-09-30T15:34:51+5:302025-09-30T15:35:12+5:30
उत्तर प्रदेशात महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याकडे कोट्यवधींची संपत्ती सापडली आहे.

३० कोटींचा मालक निघाला महसूल अधिकारी; ७ वर्षांत जमा केल्या ४१ मालमत्ता, २९ वर्षे केली एकाच ठिकाणी ड्युटी
UP Land Scam: उत्तर प्रदेशात एका अधिकाऱ्याकडे मोठं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या महसूल विभागात एक घोटाळा उघडकीस आला आहे. ज्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सामान्यतः साधी जीवनशैली जगता येते त्याच पदावरील अधिकारी करोडपती निघाला. आलोक दुबे नावाच्या या महसूल अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून कोट्यवधींची मालमत्ता जमा केल्याचे तपासात उघड झाले. योगी सरकारने त्याला पदावरून काढून लेखपाल बनवले आहे. आलोक दुबेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वादग्रस्त जमीन व्यवहारांमध्ये संगनमत आणि खोट्या नोंदी केल्याच्या आरोपावरून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आलोक दुबेवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.चौकशीत आलोक दुबे याने ४१ मालमत्ता खरेदी केल्या, ज्यांचे एकूण बाजार मूल्य अंदाजे ३० कोटी होते. त्यापैकी ८.६२ हेक्टर जमीन आलोक दुबे आणि प्रादेशिक लेखपाल अरुणा द्विवेदी यांच्या नावे आढळून आल्या. वारसाहक्क आणि दस्तावेज आणि एकाच दिवसात खाजगी कंपनीला विक्री झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई केली.
कानपूरच्या जमीन व्यवसायासाठी आलोक दुबे याचे नाव बऱ्याच काळापासून चर्चेत होते. वादग्रस्त जमिनींवर वारसा हक्क नोंदणी करून नंतर करार आणि विक्री करार करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारी वाढू लागल्यावर, प्रशासनाने कारवाई केली. चौकशीत दुबेने सिंहपूर कठहार आणि रामपूर भीमसेन येथील दोन जमिनींवर वारसा हक्क नोंदणी करून करार केले होते, या जमिनींवर कायदेशीर बंदी असतानाही. यापैकी एक जमीन आरएनजी इन्फ्रा नावाच्या खाजगी कंपनीला विकण्यात आली.
२०१६ ते २०२३ दरम्यान आलोक दुबे याने कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे. त्यांची बहुतेक मालमत्ता डूल गावात आहे. त्यांनी दोन महिन्यांत डूल गावात त्याच्या मुलाच्या नावावर तीन तुकड्या जमीन हस्तांतरित केली. २०२३ मध्ये सर्वाधिक जमिनीची नोंदणी झाली. मे २०२३ मध्ये आलोकने चार तुकड्या जमिनीची नोंदणी केली. त्यानंतर, त्याच वर्षी ऑगस्टमध्ये एक जमीन, सप्टेंबरमध्ये दोन, ऑक्टोबरमध्ये एक, नोव्हेंबरमध्ये तीन आणि डिसेंबरमध्ये एक जमीन विकण्यात आली. या ऑगस्टच्या एका करारात लेखापाल अरुणा द्विवेदी देखील भागीदार होत्या.