"लेबल कुछ है, माल कुछ है...! हे कट्टर भ्रष्टाचाऱ्यांचं सम्मेलन"; विरोधकांवर मोदींचा थेट हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:58 IST2023-07-18T12:57:35+5:302023-07-18T12:58:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपला भारत देश कुठून कुठे पोहोचू शकला असता. आम्हा भारतीयांचं सामर्थ्य कधीच कमी नव्हतं. मात्र, भ्रष्ट आणि घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर अन्यात केला आहे.

"लेबल कुछ है, माल कुछ है...! हे कट्टर भ्रष्टाचाऱ्यांचं सम्मेलन"; विरोधकांवर मोदींचा थेट हल्ला
बेंगळुरु येथे होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी थेट हल्ला चढवला. ही बैठक म्हणजे, भ्रष्टाचाऱ्यांचे सम्मेलन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे लोक अमर्याद भ्रष्टाचार करतात. हे लोक आता बेंगळुरूमध्ये जमले आहेत, असे मोदी म्हणाले. ते पोर्ट ब्लेअरमध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपला भारत देश कुठून कुठे पोहोचू शकला असता. आम्हा भारतीयांचं सामर्थ्य कधीच कमी नव्हतं. मात्र, भ्रष्ट आणि घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर अन्यात केला आहे. मला अवधी भाषेतील एका कवीतेची ओळ आठवते, "गाइत कुछ है, हाल कुछ है, लेबिल कुछ है, माल कुछ है." 24 साठी 26 होणाऱ्या राजकीय पक्षांसाठी हे एकदम परफेक्ट बसते.
हे विरोधी पक्षांचे लोक दुकाने उघडून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. हे भारताची दुर्दशा करणारे लोक आपली दुकानं उघडून बसले आहेत. यांच्या दुकानावर 2 गोष्टींची गॅरंटी आहे. हे लोक आपल्या दुकानावर जातीयवादाचे विष विकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे, भ्रष्टाचार करतात. सगळेच भ्रष्टाचारी मोठ्या प्रेमाणे भेटत आहेत. मात्र यांच्या दुकानात जमा झालेले लोक घराणेशाहीचे समर्थक आहेत. खरे तर, न खाता, न बही, जो परिवार कहे वो सही," यावरच त्यांचा विश्वास आहे. हे लोक केवळ आपल्या मुलांचाच विचार करतात, असेही मोदी म्हणाले.
हे कट्टर भ्रष्टाचाऱ्यांचे सम्मेलन आहे, असे म्हणत, जामिनावर असलेल्या काही लोकांकडे मोठ्या आदराने पाहत आहेत. ज्यांचे संपूर्ण कुटुंब जामिनावर आहे, त्यांना अधिक सन्मान मिळत आहे. हे लोक, गात एक आहेत, परिस्थिती वेगळीच आहे, यांनी लेबल काही वेगळेच लावले आहे आणि माल काही औरच आहे, असा निशाणाही मोदी यांनी साधला.