It was miscalculation or misadventure; Sushil Modi on BJP's decision of forming government with Ajit Pawar | अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच; बिहारच्या मोदींची 'मन की बात'
अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच; बिहारच्या मोदींची 'मन की बात'

ठळक मुद्देअजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ हा आजही कुतूहलाचा विषय आहे.अजित पवारांना सोबत घेणं हे 'मिस कॅलक्युलेशन' होतं, असं मत सुशील मोदी यांनी व्यक्त केलंय.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊन आता आठवडा उलटला असला, 'ठाकरे सरकार'ने आपलं काम सुरू केलं असलं, तरी त्याआधी महिनाभर रंगलेल्या सत्तानाट्याची अजूनही चवीनं चर्चा होते. खास करून, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ हा तर आजही प्रचंड कुतूहलाचा विषय आहे. हे नेमकं कसं घडलं, का घडलं, घडलं की घडवलं, कोण बरोबर - कोण चूक, यावर वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. त्यात आता बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजपाचे नेते सुशील मोदी यांनीही 'मन की बात' केली आहे. 'आज तक' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीत जिंकलो म्हणून विधानसभाही जिंकूच असं समजणं बरोबर नाही. २००३ मध्ये अटलजींच्या काळात राजस्थान, मध्य प्रदेशच्या विधानसभा आम्ही जिंकलो होतो, पण नंतर लोकसभेला पराभव झाला, याकडे सुशील मोदी यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात नेमकं काय झालं, हे ठाऊक नाही; पण अजित पवारांना सोबत घेणं हे मिस कॅलक्युलेशन (चुकीचं गणित) किंवा मिस अ‍ॅडव्हेन्चर (चुकीचं धाडस) होतं. अजित पवार आमदार घेऊन येतील असं वाटलं, पण ते आणू शकले नाहीत, असं त्यांनी नमूद केलं. ही चूक कशी झाली माहीत नाही, मात्र राजकारणात हार-जीत होतच असते. जे झालं त्याबद्दल वाईट वाटतं, असं म्हणत त्यांनी कुणावरही दोषारोप करणं टाळलं.

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाल्यानं, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. आधी भाजपानं, नंतर शिवसेनेनं आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादीनंही सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अखेर, बऱ्याच बैठका, राजी-नाराजीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सूत जुळलं होतं. हे तिघं सरकार स्थापन करणार, हे पक्कं झालं असतानाच, २३ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना टीव्हीवर झळकले होते आणि राज्यात राजकीय भूकंपच झाला होता.

त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बऱ्याच हालचाली झाल्या, कौटुंबिक - भावनिक आवाहनं झाली, पळवापळवी-पकडापकडीचे खेळ झाले, प्रकरण कोर्टात गेलं आणि साडेतीन दिवसात देवेंद्र सरकार कोसळलं. या घटनाक्रमाचे पडसाद पुढच्या राजकारणावर उमटत राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच, हे सुशील मोदी यांचं मत महत्त्वाचंच आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाण्याआधी अजित पवार यांनी आपल्याला कल्पना दिली होती आणि आपण त्यांना होकारही दिला होता, मात्र शपथविधीबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नव्हती, असा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र काम करण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. 

Web Title: It was miscalculation or misadventure; Sushil Modi on BJP's decision of forming government with Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.