'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:41 IST2025-02-03T21:40:27+5:302025-02-03T21:41:17+5:30
'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली.'

'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन
Nirmala Sitharaman Slams Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल यांचे दावे फेटाळून लावत UPA सरकारच्या काळात काहीही कामे झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.
यूपीए सरकारच्या काळात देशाचे नुकसान
आजतकशी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली. यूपीए सरकारने दहा वर्षांत देशाचे जेवढे नुकसान केले, ते साफ करायलाच आम्हाला चार-पाच वर्षे लागली. राहुल गांधींना बँका आणि व्यवसायांच्या खराब स्थितीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.'
बँकांचे नुकसान आम्ही भरून काढत आहोत!
'यूपीएच्या दहा वर्षांच्या काळात उद्योगपतींनी नोकऱ्यांना टाळे ठोकले होते. त्यांच्या कार्यकाळात बँकांचे खूप नुकसान झाले आणि बँकांमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेचेही नुकसान झाले. ज्यांना बँकेचे फायदे मिळाले, ते देश सोडून गेले. त्यांच्या काळात पैसे घेऊन पळून गेलेल्यांची मालमत्ता आम्ही जप्त केली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर आज 18-22 हजार कोटी रुपये परत दिले जात आहेत. त्यामुळेच राहुल गांधींना बोलण्याचा अधिकार नाही,' असा हल्लाबोल निर्मला सीतारामन यांनी केला.
चीनने भारताची जमीन बळकावली?
मेक इन इंडिया उपक्रम अपयशी ठरला, त्यामुळेच चीनने भारतीय भूमीवर कब्जा केला, या राहुल गांधींच्या दाव्यावर सीतारामन म्हणाल्या, 'त्यांच्या आजोबांच्या काळात चीन आणि पाकिस्तानने लडाखमध्ये किती भूभाग बळकावला होता? सामंजस्य करार करताना तुम्ही चीनला आपली जमीन परत करण्यास सांगितले होते का?' असा सवालही निर्मला सीतारामन यांनी विचारला.