आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता; अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 08:07 IST2024-12-18T08:06:54+5:302024-12-18T08:07:54+5:30
Amit Shah Ambedkar Remark row: यावरून आता संसदेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. जयराम रमेश यांनी अमित शाह यांचा संसदेतील या भाषणावेळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता; अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेतील संविधानावरील चर्चेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी शाह यांनी विरोधक सारखे आंबेडकर, आंबेडकर करत असल्यावरून टीका केली. यावरून आता विरोधकांनी शाह यांनी आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत माफी मागण्याची मागणी केली आहे.
भाजपा आणि आरएसएसचे लोक बाबासाहेब आंबेडकर यांचा किती तिरस्कार करतात हे अमित शाह यांच्या टिप्पणीतून दिसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जयराम रमेश यांनी अमित शाह यांचा संसदेतील या भाषणावेळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये शाह हे विरोधक सारखे सारखे आंबेडकर, आंबेडकर असा जाप करत असल्यावरून टोला हाणताना दिसत आहेत.
काय म्हणाले अमित शाह....
आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असे सारखे म्हणत राहणे ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. जर तुम्ही एवढ्यावेळा देवाचे नाव घेतला असता तर तुम्हाला सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती, असे शाह म्हणाले. यानंतर लगेचच शाह यांनी आंबेडकर यांचे १०० वेळा नाव घ्या, पण मी तुम्हाला आंबेडकरांबद्दल खरे काय वाटते ते सांगेन असे शाह यांनी म्हटले.
"अभी एक फैशन हो गया है- अंबेडकर, अंबेडकर, अंबेडकर, अंबेडकर, अंबेडकर..
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 17, 2024
इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता."
अमित शाह ने बेहद घृणित बात की है.
इस बात से जाहिर होता है कि BJP और RSS के नेताओं के मन में बाबा साहेब अंबेडकर जी को लेकर बहुत नफरत है.
नफरत… pic.twitter.com/UMvMAq43O8
यावरून आता संसदेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. यावरून राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, जे मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात त्यांना नक्कीच आंबेडकरांबाबत समस्या असतील. तर रमेश यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, 'द्वेष एवढा आहे की बाबासाहेबांचे नाव घेऊनही चिडतात. हे तेच लोक आहेत ज्यांचे पूर्वज बाबासाहेबांचे पुतळे जाळत असत, जे स्वतः बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. लज्जास्पद! यासाठी अमित शहा यांनी देशाची माफी मागावी'.