शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं सरकारचं कर्तव्य, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी
By मोरेश्वर येरम | Updated: December 9, 2020 19:17 IST2020-12-09T19:15:18+5:302020-12-09T19:17:09+5:30
थंडीच्या दिवसात शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं सरकारचं कर्तव्य, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी
नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोध पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. सर्वांनी यावेळी राष्टपतींकडे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
"थंडीच्या दिवसात शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे", असं शरद पवार म्हणाले. विरोधकांनी राष्टपतींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सिस्ट) नेते सीताराम येचुरी यांच्यासहीत पाच नेते यावेळी उपस्थित होते.
"कृषी विधेयकांवर सखोल चर्चा व्हायला हवी होती. तशीच सर्व विरोधी पक्षांची मागणी होती. दुर्दैवाने या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि विधेयकं घाईघाईनं मंजूर केली गेली", असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास राहीला नाही: राहुल गांधी
शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर कुणीच उभं राहू शकत नाही. शेतकरी आता मागे हटणार नाहीत आणि कुणालाही घाबरणार नाहीत. जोवर हे काळे कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर शेतकरी आंदोलन सुरुच ठेवतील, असं राहुल गांधी म्हणाले. यासोबत शेतकऱ्यांना आता मोदी सरकारवर विश्वास राहिला नसल्याचा घणाघात राहुल यांनी यावेळी केला.